Saturday, October 3, 2026
HomeनगरAMC : महापालिका उभारणार कर्जावर व्यापारी संकुले

AMC : महापालिका उभारणार कर्जावर व्यापारी संकुले

बँकांकडून कर्ज प्रस्ताव मागवले || ई-लिलाव व लीजमधून कर्जफेडीचे नियोजन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील पाच महत्त्वाच्या व्यापारी संकुलाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्यक निधीपैकी 75 टक्के निधी कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील बँकांकडून प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या पाच मोठ्या प्रकल्पांमध्ये चितळे रस्ता येथील नेहरू मार्केट विकसित करण्याच्या प्रकल्पाचा समावेश असून त्याची एकूण किंमत 11.42 कोटी रूपये आहे व त्यासाठी 8.56 कोटी रूपयांच्या कर्जाची आवश्यकता आहे. सर्जेपुरा रंगभवन येथे व्यापारी संकुल व सांस्कृतिक केंद्र विकसित केले जाणार असून, या 33.61 कोटी रूपयांच्या प्रकल्पासाठी 25.21 कोटी रूपयांचे कर्ज अपेक्षित आहे. याशिवाय प्रोफेसर कॉलनी चौक येथे 27.48 कोटी रूपयांचे व्यापारी संकुल उभारले जाणार असून त्यासाठी 20.86 कोटी रूपयांचा वित्तपुरवठा आवश्यक आहे.

अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावरील जुने एनसीसी कार्यालय येथे नियोजित व्यापारी संकुलाची किंमत 30.48 कोटी रूपये असून याकरिता 22.86 कोटी रूपयांची कर्ज आवश्यक आहे. तसेच, गंज बाजार येथे 11.70 कोटी रूपये खर्चून भाजी मंडई व व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठी 8.77 कोटी रूपयांच्या कर्जाची आवश्यकता आहे. या प्रकल्पांसाठी दीर्घकालीन कर्ज, स्पर्धात्मक व्याजदर, परतफेडीचा कालावधी आणि इतर आवश्यक अटी व शर्तींचा समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव बँकांनी सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा ई-लिलाव करून त्यातून मिळणारी रक्कम, गाळेधारकांकडून 30 वर्षांच्या लीजवर ‘नॉन-रिफंडेबल डिपॉझिट’ जमा केले जाईल आणि सोबतच गाळ्यांचे मासिक भाडे मिळेल व यातून कर्जाची रक्कम फेडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या संकुलाच्या माध्यमातून महानगरपालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, असा विश्वास आयुक्त डांगे यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...