अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 68 पैकी 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून उर्वरित 63 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे अधिकृत राजपत्र मंगळवारी (20 जानेवारी) प्रसिद्ध करण्यात आले. राजपत्र प्रसिद्ध होताच महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना या पक्षांमध्ये गट नोंदणीच्या हालचालींना वेग आला आहे.
महापालिकेतील गट नोंदणीसाठी संबंधित पक्षांच्या विजयी उमेदवारांना नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन रितसर गट नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर गट नोंदणीचे अधिकृत पत्र महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. निवडणूक निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे 27 नगरसेवकांचे संख्याबळ आहे, तर भाजपकडे 25 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. शिवसेनेकडे 10 नगरसेवकांचे संख्याबळ असून इतर पक्ष व अपक्षांची संख्या मर्यादित आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडे मिळून महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ उपलब्ध असल्याने त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग तुलनेने सोपा मानला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची गट नोंदणीपूर्व बैठक बुधवारी सकाळी शहरातील एका हॉटेलमध्ये होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असून, त्यानंतर नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात रितसर गट नोंदणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, गुरुवारी महापालिकेच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत होणार आहे. आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर महापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत अहिल्यानगर महापालिकेतील सत्तास्थापनेचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.




