अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या कामांमध्ये दर्जा तपासणारे गुणवत्ता अहवाल बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करून कोट्यवधींची बिले लाटत घोटाळा केल्याची तक्रार ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी सन 2023 पासून प्रशासन, सरकारकडे करत आहेत. मात्र त्याची कोणतीही दखल न घेतली गेल्यामुळे, अखेर छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये घोटाळ्यातील दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी जनहित याचिका दाखल केली असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.
काळे म्हणाले, 22 सप्टेंबर 2025 रोजी खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. दहशत, गुंडगिरी, दबाव यामुळे सर्वसामान्य नगरकर तक्रार करत नाहीत. समोर येऊन बोलू शकत नाहीत. त्यामुळे ही जनहित याचिका तांत्रिकदृष्ट्या मी दाखल केली असली तरी ती या शहरातील लाखो सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने दाखल केली आहे. या लढाईत मी एकटा नसून कोट्यावधी रूपयांचा कर भरणारे नगरकर रस्त्यांसाठी लढत आहे. काळे यांनी मे 2023 पासून 14 जुलै 2025 पर्यंत सर्व स्तरावर लेखी तक्रारी केल्या. आंदोलने केली. जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला. त्यावेळी तोफखाना पोलिसांनी काळे यांना आंदोलना पूर्वीच ताब्यात घेतले.
मनपा आयुक्तांच्या मान्यतेने उपायुक्त, शहर अभियंता यांनी पोलीस निरीक्षकांच्या दानात 31 मे 2023 रोजी काळे यांच्याशी चर्चा करत दीड महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन देखील दिले. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. त्यानंतर काळे यांनी अँटी करप्शनचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे धाव घेत 28 नोव्हेंबर 2023 रोजी तक्रार दाखल केली. ढीगभर पुरावे सादर केले. तक्रारीचा पाठपुरावा केला. त्यानंतर तब्बल एक वर्षाने 7 ऑक्टोंबर 2024 रोजी अहिल्यानगर अँटी करप्शनने काळेंचा जबाब नोंदवला. मात्र त्यानंतर हे प्रकरण राजकीय दबावातून पुन्हा दडपले गेल्याचे काळे यांचे म्हणणे आहे.




