Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयमनपा स्थायी समितीत आठ सदस्यांची नियुक्ती

मनपा स्थायी समितीत आठ सदस्यांची नियुक्ती

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

पाच महिन्यानंतर अर्धवट अवस्थेत असलेल्या स्थायी समितीत गुरुवारी रिक्त जागांवर आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे आगामी सभापतिपदाच्या निवडीसाठी आता मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

- Advertisement -

सत्ताधारी भाजप आणि त्यांना सत्तेला विनाशर्त पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादीने सभापतिपद मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीकडून तिघे, शिवसेना व भाजपकडून प्रत्येकी दोन आणि काँग्रेसच्या एका सदस्याची पक्षीय बलानुसार स्थायी समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली.

16 सदस्य असलेल्या स्थायी समितीत तब्बल सहा महिन्यानंतर पूर्ण संख्या आली आहे. बसपाचे मुदस्सर शेख हे सभापती आहेत. नव्या सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर आता सभापतिपदाची निवडणूक घ्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाकडून नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यास मान्यता मिळते का आणि कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जानेवारी महिन्यात सभापतिपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने नव्या सभापतीला सहा महिन्यांचाच कार्यकाळ मिळणार आहे. असे असले तरी सभापती होण्यासाठीची चुरस होण्याची शक्यता अधिक आहे.

महापौरपदाच्या सत्तेची बेरीज करताना बसपाला सभापतिपदाचा शब्द देण्यात आला होता. त्यानुसार सभापतीची पहिली टर्म मुदस्सर शेख यांना मिळाली. दुसरी टर्म अश्विनी जाधव यांना मिळणार असल्याची चर्चा होती.

निवडणूक न झाल्याने शेख यांच्याकडेच कार्यभार राहिला. तसेच शेख स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्यास बसपच्या कोट्यातून अश्विनी जाधव यांची नियुक्ती करता येऊ शकते. तशा हालचालीही मध्यंतरी झाल्या. मात्र त्या देखील नंतर थंडावल्या. त्यामुळेच बसपाला सभापतिपद न देता ते राष्ट्रवादी किंवा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे.

नवनियुक्त सदस्य

राष्ट्रवादी – डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, परवीन कुरेशी

शिवसेना – श्याम नळकांडे, विजय पठारे

भाजप – मनोज कोतकर, सोनाबाई शिंदे

काँग्रेस – सुप्रिया जाधव

कोतकर-वाकळे दावेदार

स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपकडून मनोज कोतकर व राष्ट्रवादीकडून कुमारसिंह वाकळे, गणेश भोसले दावेदार मानले जातात. कोतकर भाजपचे नगरसेवक असले तरी त्यांचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. कुमार वाकळे हे आ. जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत. गणेश भोसले देखील आमदारांच्या जवळचे असले तरी त्यांनी यापूर्वी सभापतिपद भोगलेले आहे. अनुभवी म्हणून त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यातील महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत शिवसेना असली, तरी नगर महापालिकेत मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजपला जवळ केले आहे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही अनोखी आघाडी येथे आकाराला आली. स्थायी समितीतही शिवसेनेला पदापासून दूर ठेवण्याच्या हालचाली यावेळीही शिजत आहे. शिवसेनेचे समितीत पाच सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे पाच, काँग्रेस एक, भाजपचे चार या संख्याबळावर राष्ट्रवादी सभापतिपद मिळविण्याच्या प्रयत्नात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या