मुंबई | Mumbai
रत्नागिरीत घेण्यात आलेल्या प्रचारसभेत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शाह हे रत्नागिरीत दाखल झाले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आपल्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव घेऊ शकतील का? त्यांच्यात हिंम्मत आहे का? नाही तर तुम्ही शिवसेनेचे नाही तर नकली सेनेचे अध्यक्ष आहात, असा टोला अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
हे ही वाचा – सुषमा अंधारेंच्या हेलिकॉप्टरचे क्रॅश लँड
सिंधुदुर्गच्या भूमीवर मी आपल्यासमोर आज उभा आहे. ऐतिहासिक सिंधुदूर्ग किल्ला हिंदवी स्वराज्यची आठवण करून देतो, असे अमित शाह सुरुवातीला म्हणाले. पुढे ते म्हणाले, “मी आज सिंधुदूर्ग – रत्नागिरीत आलो आहे. तर एवढेच सांगेन की आजच्या नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात वीर सावरकर यांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत आहे का? सावरकरांचे नाव घेण्याची हिंमत तुमच्यात नाही तर तुमची कसली शिवसेना. तुमची नकली शिवसेना आहे.”
मोदींना पंतप्रधान बनवण्याचा अर्थ आहे की देश सुरक्षित आहे. काश्मीर आमचा आहे की नाही? काश्मीर आमचा आहे, पण खर्गे म्हणतात की राजस्थान आणि महाराष्ट्रातील लोकांचा काश्मीरचा काय संबंध. रत्नागिरी सिंधुदुर्गातील लहान मुलगाही काश्मीरसाठी आपले प्राण देऊ शकतो”, असेही अमित शाह म्हणाले.
यंदाची निवडणूक ही पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पीएम बनण्यासाठी आहे. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी नारायण राणेंना प्रचंड मतांनी निवडणू द्या. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवल्याने देश तिसरी आर्थिक महासत्ता होईल. मोदींनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्यास्थानी आणल्याचा दावा अमित शहा यांनी केलाय. यामुळे मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करणे म्हणजे देशाला सशक्त करणे, असे शाह म्हणाले.