राहाता । प्रतिनिधी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार संवेदनशील आहे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी या तिन्ही नेत्यांचं कौतुक करताना म्हटलं, “महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजी, एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे त्रिमूर्ती आहेत, या तिघांपैकी एकही बनिया (व्यापारी) नाहीत. पण, हे तिघेही पक्के व्यापारी तत्वाचे आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी केंद्रासमोर ठामपणे बाजू मांडली.” त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला.
यानंतर शाह यांनी विरोधकांवर तीव्र टीका केली. औरंगजेबाचे नाव घेत त्यांनी विरोधकांच्या दुहेरी भूमिकेवर प्रहार केला. “जे खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, तेच औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर ठेऊ शकतात. पण जे औरंगजेबाचे पाईक आहेत, त्यांच्यात ती हिंमतच नाही,” असा टोला शाह यांनी लगावला. त्यांनी सांगितले की, महायुती सरकारनेच औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर या शहरांची नामांतर प्रक्रिया पूर्ण केली.
राज्य सरकारने 13 मार्च 2024 रोजी ‘अहिल्यानगर’ नावास मान्यता दिली होती, तर केंद्र सरकारने 4 ऑक्टोबर 2024 रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. यापूर्वी औरंगाबादचं नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचं ‘धाराशिव’ करण्यात आलं होतं. या तिन्ही नामांतरांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला नवा अर्थ मिळाल्याचं शाह यांनी नमूद केलं.
लोणी येथील सभेत शाह यांनी स्वदेशीचा नारा देत आर्थिक आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला. “जर प्रत्येक भारतीयाने परदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा संकल्प केला, तर 2047 पूर्वी भारत विकसीत देश बनेल,” असं ते म्हणाले. भारतातील 140 कोटी लोकांची बाजारपेठ ही जगातील सर्वात मोठी आहे आणि त्याचा लाभ देशातील उद्योगांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केलं.
शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत असून, “महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं आहे,” असेही शाह यांनी ठासून सांगितले. त्यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, “या दोन्ही थोर नेत्यांनी सहकारातून ग्रामीण भागात विकासाची क्रांती घडवली. त्यांचं योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात अमिट आहे.” अमित शाह यांच्या या भाषणाने सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांना दिलेला दिलासा, विरोधकांवरील प्रहार आणि स्वदेशीचा नारा यामुळे त्यांचे भाषण राज्याच्या राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू ठरले आहे.




