अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
माझे भाऊ मनोज जरांगे पाटील हे मुंबईत जाण्यापूर्वी सणावाराचे दिवस आहेत, गणेशोत्सव आहे, गर्दीचे दिवस आहेत, हे सर्व लक्षात घेऊनच जे करायचे ते शांतीपूर्ण करतील, अशी अपेक्षा अमृता देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नगरमध्ये बोलतांना व्यक्त केली. अमृता फडणवीस एका कार्यक्रमासाठी नगरमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जाण्याचा इरादा व्यक्त केला आहे, याकडे लक्ष वेधले असता अमृता फडणवीस यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
यापूर्वी फडणवीस यांनी जरांगे यांना जेवणाचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर जरांगे यांनी जेवणासाठी जाण्याची ही वेळ नव्हे, आमचे आंदोलन सुरू आहे. भाऊबीजेला साडीचोळी घेऊन फडणवीस यांच्याकडे जाऊ असे उत्तर दिले होते. या संदर्भात बोलताना अमृता फडणवीस यांनी, मनोज जरांगे आमच्याकडे जेवणासाठी येतील त्याची मी वाट पहात आहे, असे उत्तर दिले. मराठा आरक्षणावर प्रश्नाकडे लक्ष वेधले असता अमृता फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्या म्हणाल्या आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे. राज्य सरकार प्रश्न सोडवण्याच्या शोधात आहे. त्यामुळे मी काही वेगळे बोलण्यापेक्षा सरकार उत्तर शोधत आहे.
नवरात्रात गरबा कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याची भूमिका घेतली जात आहे, याकडे लक्ष वेधले असतात त्यांनी, मी वेगळ्या कार्यक्रमासाठी येथे आले आहे. त्यामुळे आणि यावर मी यापूर्वी उत्तर दिले आहे. त्यामुळे अधिक काही बोलणार नाही, असे स्पष्ट केले. राष्ट्रीयकृत बँका व खासगी बँकांनी पाच दिवसाच्या आठवड्यासाठी संप जाहीर केला, या प्रश्नावर त्या म्हणाल्या आंतरराष्ट्रीय बँका शनिवार व रविवारी सुट्टी देतात. परंतु भारतातील खासगी आणि सरकारी बँका शनिवार-रविवार सुट्टी देत नाहीत, हा धोरणात्मक निर्णय आहे, तो मिळून मिसळून घेतील.
मुख्यमंत्री महाराष्ट्राप्रती कर्तव्यनिष्ठ, याचा आनंद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार दिल्लीला जात आहेत, त्यांची बढती होणार का, असा प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातच असतात, महाराष्ट्रासाठी खूप काही करत असतात, त्याच्या मान्यता घ्याव्या लागतात, त्यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागते. महाराष्ट्रप्रती ते कर्तव्यनिष्ठ आहेत, याचा मला आनंद होतो.




