Monday, May 6, 2024
Homeनगरअंगणवाडी कर्मचार्‍यांचे श्रीरामपुरात आंदोलन

अंगणवाडी कर्मचार्‍यांचे श्रीरामपुरात आंदोलन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अंगणवाडी केंद्रासाठी इंग्रजी ऐवजी मराठीत पोषण ट्रॅकर अ‍ॅप द्या, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्या, अंगणवाडी कर्मचार्‍यांची कोविडच्या कामातून मुक्तता करा, शासनाने जाहीर केलेल्या 50 लाख विमा योजनेची अंमलबजावणी करा यासह विविध प्रश्‍नांसाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्यावतीने सोमवार दि. 31 मे 2021 रोजी जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. श्रीरामपूर येथे झालेल्या आंदोलनाच्यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, श्रीरामपूरच्या प्रकल्प अधिकारी आशा लिफ्टे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की, करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर अंगणवाडी कर्मचार्‍यांना विविध प्रकारची कामे सांगितली जात आहेत. करोना योद्धे म्हणून त्याच्या कामाचा गौरव ही सरकार करत आहे; परंतु त्यांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी मात्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.अनेक वर्षांपासून अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा देण्याची, दरमहा पेन्शन देण्याची मागणी अद्याप प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडी केंद्रातील लाभार्थींची माहिती भरण्यासाठी देण्यात आलेला अ‍ॅप मराठीत द्यावा, कर्मचार्‍यांना करोनाची कामे देऊ नये, अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा, अशा विविध मागण्या अद्याप प्रलंबित आहेत.

- Advertisement -

यासह केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या मुळावर उठणारे 3 कायदे रद्द करावेत, सरकारने 41 कामगार कायदे बदलून आणलेल्या कामगार विरोधी नवीन 4 श्रम संहिता रद्द करा, सरकारी उद्योगांचे खाजगीकरण थांबवा, वीज दुरूस्ती विधेयक मागे घ्या आदींसह विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कृति समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू असून त्या पार्श्‍वभूमीवर युनियनच्यावतीने जिल्हाभर हे आंदोलन करण्यात आले. सदर प्रश्‍नी सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी आंदोलनात युनियनचे सहचिटणीस कॉ.जीवन सुरूडे, कॉ.श्रीकृष्ण बडाख, स्मिता लोंढे, अनिता परदेशी, प्रमिला सुलाखे, रेखा शिरसाठ, अनिता होले, ज्योती लबडे इ.सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या