मुंबई | Mumbai
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढतानाच दिसत आहे. कारण ईडीनंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती अनिल अंबानी यांच्या सहा ठिकाणांवर छापे टाकले आहे. याआधी कर्ज घोटाळाप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. त्यानंतर आज सीबीआयने अनिल अंबानी यांच्या जवळपास सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने १७००० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात अनिल अंबानींशी संबंधित ठिकाणांवर झाडाझडतीला सुरुवात केली आहे.
सीबीआयने सकाळी सुमारे ७ वाजल्यापासूनच अनिल अंबानींच्या घरावर छापेमारी सुरू केली आहे. सीबीआयच्या ६ ते ७ अधिकाऱ्यांचे पथक या ठिकाणी तळ ठोकून असून, १७ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे आणि पुरावे शोधले जात आहेत. अंबानी समूहातील काही कंपन्यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे कर्ज वळवल्याचा गंभीर आरोप आहे. यापूर्वी ईडीनेही अंबानी आणि त्यांच्या कंपनीतील प्रमुख अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले होते.
या छापेमारीपूर्वी CBI ने दोन एफआयआर दाखल केले होते. यानंतर, ईडीने अनिल अंबानींच्या ठिकाणांवर छापा टाकला होता. यानंतर आता, सीबीआयही तपास करत आहे. हा छापा १७००० कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्यासंदर्भात आहे. जे आर्थिक वर्ष 2017 ते 2019 दरम्यान यस बँकेने अनिल अंबानींच्या कंपन्यांना बेकायदेशीरपणे कर्जाच्या स्वरुपात ट्रांसफर केले होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांच्याकडून कागदपत्रे सादर करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागण्यात आली होती. येस बँकेने मंजूर केलेल्या कर्जांमध्ये अनियमितता आणि इतर कंपन्यांद्वारे निधी वळवला असल्याचा ईडीला संशय आहे. बँक अधिकारी आणि कर्जदार कंपन्यांमध्ये लाचखोरी अथवा आर्थिक देवाणघेवाण झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे.
यापूर्वी सक्त वसुली संचालनालयाने रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची १७ हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणात चौकशी केली होती. त्यावेळी ईडीने अनिल अंबानी यांच्या कंपन्या आणि आस्थापनांवर छापेमारी केली होती. ईडीने रिलायन्स ग्रुपशीसंबंधित ५० व्यावसायिक संस्था आणि २५ खासगी ठिकाणी धाडी घातल्या होत्या. २४ जुलै रोजी ईडीने मुंबईत याचप्रकरणात ३५ जागी धाड घातली होती.
कर्जाची रक्कम कथितपणे इतर कंपन्यांकडे वळवण्यात आली आणि मनी लाँड्रिंगच्या कक्षेत येणाऱ्या विहित उद्देशाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापरली गेली, असा आरोप आहे. या छाप्यांमध्ये अनेक कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर पुरावे ताब्यात घेण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




