मुंबई | Mumbai
मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यात सभागृहात तु तु मे मे झाली. मराठी माणसाला मुंबईत घरांसाठी आरक्षण मिळावे, यासाठी कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. मात्र, यावरून वादाला सुरुवात झाली आणि शंभूराजे देसाई यांनी अनिल परबांना बाहेर ये तुला दाखवतो, अशी धमकी दिली.
गुरवारी विधान परिषदेच्या सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात अनिल परब विरुद्ध शंभूराज देसाई यांच्यात शाब्दिक सामना रंगल्याचे पहायला मिळाले. या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अनिल परब यांनी शंभूराज देसाईंना गद्दार असे म्हंटले. ज्यानंतर शंभूराज देसाईंनी गद्दार कुणाला म्हणतो रे? बाहेर भेट मी बघतो असे म्हणत अनिल परब यांना ललकारले. हा वाद इतका वाढला की विधान परिषदेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या वादातले आक्षेपार्ह शब्द रेकॉर्डवरुन काढून टाकत असल्याचे जाहीर केले.
अनिल परब यांनी विधानपरिषदेत म्हटले की, ‘मराठी माणसाला प्राधान्याने घर मिळायाल हवे, असा कायदा तयार करा, PAPसाठी कायदा करता, SC STसाठी कायदा आहे, नवनवीन रिडेव्हलपमेंट होते, ४० टक्के घरे मराठी माणसाला परवडतील अशी बांधण्यासाठी आपण कायदा करणार आहात का? इच्छा फक्त सभागृहात बाहेर गेले की, व्यावसायिकांची दादागिरी सुरू होते..’, असे अनिल परब म्हणाले.
‘कायदा केल्याशिवाय मराठी माणसाला न्याय मिळणार नाही. प्रत्येक मराठी माणसाचे अधिवेशनाकडे लक्ष असते. तुम्ही आता या संदर्भात कायदा करणार आहात का? मराठी माणसाला घर देण्यासाठी ४० टक्केची अट टाकून कायदा आणणार आहात का?’, असा सवाल परब यांनी उपस्थित केला.
या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, “मुंबईत मराठी माणसाला सन्मान मिळावा, ही जशी तुमची भावना आहे तीच आमचीही भावना आहे. परंतु, २०१९ ते २०२२ या काळात तुमचे सरकार असताना हा कायदा का केला नाही? तुमच्या सरकारने मराठी माणसाकडे दुर्लक्ष केले”, असे देसाई म्हणाले.
मात्र, यानंतर अनिल परब यांचा चांगलाच पारा चढला आणि त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “आमच्या सरकारमध्ये तुम्हीही मंत्री होता, मग तुम्ही तेव्हा काय करत होता? तुम्ही जेव्हा सरकारमध्ये होता, तेव्हा गद्दारी कशी करायची हे ठरवत होता”, असे परब म्हणाले. परब यांनी गद्दार शब्दाचा उल्लेख केल्याने शंभूराज देसाई प्रचंड संतापले. “तू गद्दार कोणाला बोलतो. तू बूट चाटत होता. बाहेर ये तुला दाखवतो”, अशी धमकी त्यांनी परब यांना दिली. यावरून सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




