Tuesday, October 22, 2024
Homeनगर3 हजार 500 जनावरांच्या पोटात सोडणार मॅग्नेट कॅप्सूल

3 हजार 500 जनावरांच्या पोटात सोडणार मॅग्नेट कॅप्सूल

15 हजार शेतकरी, पशूपालकांच्या पशूधनाला ‘सुरभी सुरक्षे’चा लाभ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशूधन आहे. या पशूधनाला विविध आरोग्य सुविधा देण्यासोबत यंदापासून नगर जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभाग जिल्ह्यातील तीन हजार ते 3 हजार 500 जनावरांच्या पोटात मॅग्नेट कॅप्सूल सोडणार आहे. या कॅप्सूलच्या माध्यमातून जनावरांच्या पोटात जाणारी लोखंडी वस्तूही एकाच जागेवर थांबता येणार आहे. यामुळे जनावरांवर शस्त्रक्रिया करून त्याचे जीव वाचवता येणार आहे. जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाने या योजनेला ‘सुरभी सुरक्षा’ असे नाव दिलेले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्हा परिषद पशूसवंर्धन विभाग 2024-25 या आर्थिक वर्षात विविध लाभाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील 14 हजार 824 शेतकरी, पशूपालक लाभार्थ्यांची निवड करत त्यांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे. यासाठी निवड करण्यात येणार्‍या लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. राबवण्यात येणार्‍या योजनामध्ये काही वैयक्तीक लाभाच्या योजनांचा समावेश असल्याचे जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

यंदाच्या आर्थिक वर्षासाठी राबवण्यात येणार्‍या योजनामध्ये जिल्हा वार्षिक योजना (विशेष घटक) यात दुभत्या जनावरांना सकस पशूखाद्य वाटप करणे (100 टक्के अनुदान) यासाठी 1 हजार 213 लाभार्थी यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपयोजना दुभत्या जनावरांना सकस पशूखाद्य वाटप (100 टक्के अनुदान) 101 लाभार्थी, जिल्हा वार्षिक योजना आदिवासी उपयोजना शेतकर्‍यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी वैरण बियाणे वाटप करणे (100 टक्के अनुदान) 375 लाभार्थी, जिल्हा वार्षिक योजना आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना दुभत्या जनावरांना सकस पशू खाद्य वाटप (100 टक्के अनुदान) 606 लाभार्थी यासह शेतकर्‍यांच्या क्षेत्रावर वैरण उत्पादनासाठी वैरण बियाणे वाटप (100 टक्के अनुदान) 7 हजार 887 लाभार्थी, मुरघास वापरासाठी कमाल 2 दुधाळ पशूधनासाठी 33 टक्के अनुदानावर 500 लाभार्थी, खनिजमिश्रण वापरासाठी कमाल 2 दुधाळ जनावरांना 33 टक्के अनुदानावर 4 हजार लाभार्थी यांची निवड करण्यात येणार आहे.

यासह जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून 133 लाभार्थी यांची 60 टक्के अनुदानावर दूध काढणी यंत्र वाटपासाठी निवड करण्यात येणार आहे. तसेच याच फंडातून 50 टक्के अनुदानावर मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी प्रोत्सहान अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेतही 75 लाभार्थी यांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीराव लांगोरे आणि जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद डॉ. दशरथ दिघे यांनी ‘सार्वमत’ ला दिली. या योजनेच्या लाभासाठी शेतकरी अथवा पशूपालक यांनी जवळच्या पशूसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांत अथवा पशूधन विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा. या योजनांचे अर्ज हे 24 जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व पशूवैद्यकीय दवाखान्यांत सविकारण्यात येणार असल्याचे दिघे यांनी सांगितले.

जिल्ह्यात जनावरांच्या पोटात लोखंडी वस्तू गेल्यामुळे त्यांचा मृत्यूचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात जनावरांसाठी सुरभी सुरक्षा योजनेत जनावरांच्या पोटात मॅग्नेट कॅप्सूल सोडण्यात येणार आहे. कॅप्सूलमूळे जनावरांच्या पोटातील लोखंडी वस्तू, तार यांना एकाच जागेवर थांबवता येणार आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया करून ती लोखंडी वस्तू जनावरांच्या पोटातून काढत संबंधीत जनावराला जीवदान देता येणार असल्याचे पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

लॉटरी पद्धतीने निवड
जिल्हा परिषद पूशसंवर्धन विभागाने विशेष घटक योजनेसह जिल्हा परिषद सेस फंडातून सात योजनांव्दारे मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, पशूपालक यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या याजनेसाठी लाभार्थी निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या