मुंबई । Mumbai
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहभागी झाले. मात्र या ऐतिहासिक कार्यक्रमापेक्षा शाह यांचा खास सुतारवाडी दौरा आणि त्यासाठी करण्यात आलेली खर्चिक व्यवस्था यावरच अधिक चर्चा रंगली आहे.
गृहमंत्री अमित शाह हे रायगड कार्यक्रमानंतर थेट खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील घरी स्नेहभोजनासाठी गेले. ही भेट खासगी स्वरूपाची असूनही त्यासाठी शासनाच्या तिजोरीवर १ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. सुतारवाडीत हेलिकॉप्टर उतरण्यासाठी खास ४ हेलिपॅड तयार करण्यात आली होती. या संदर्भातील टेंडर ९ एप्रिल रोजी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचे उघड झाले आहे.
यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जनतेच्या कष्टाने कमवलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खासहेलिपॅड? अमित शाह यांची भेट वैयक्तिक होती. तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी? अमित शाहांना जेवायला घालायचंय तर खुशाल घाला. सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला. ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी? असा सवाल करीत तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा, अशा शब्दात दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करीत सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगला ताळमेळ जाणवतोय, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.