Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअण्णांनी घेतला थांबण्याचा निर्णय

अण्णांनी घेतला थांबण्याचा निर्णय

सुपा |वार्ताहर| Supa

सन 1975 साली राळेगणसिद्धी येथे कामाला सुरुवात केली जवळपास 45 वर्षांचा काळ लोटला आहे.

- Advertisement -

गावातील सगळे कार्यकर्ते आज जे काम करत आहेत ते पाहून प्रत्यक्षात काम करताना जेवढा आनंद झाला नव्हता त्यापेक्षाही अधिक आनंद आता गावातील विकासकामे पाहून होतो. यापुढे मी काम सुरू ठेवलं तर कार्यकर्ते गहाळ पडतात, तसे होऊ नये यासाठी राळेगणसिद्धीच्या कामातून मी हळूहळू निवृत्त होत आहे, अशी घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केली.

करोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांनंतर प्रथमच रविवारी विजयादशमीचे औचित्य साधत पद्मावती मंदिरात हजारेंनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी अनेक जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. हजारे म्हणाले गावात एकाच्या घरी मोटारसायकल आली तर सगळं गाव पहायला जमायचे,अशी परीस्थिती एक वेळ गावाची होती, पण आज गावाची संपूर्ण परिस्थिती पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामामुळे बदलली आहे.

सामुदायिक विवाह 1980 ला सुरू केले. त्यावेळी पाणलोट क्षेत्र विकासाचे काम एवढे झालेले नव्हते. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने तहसिलदार यांना सांगूनही पाण्याचे टँकर आले नव्हते. मी उपोषण सुरू केल्यावर महिला डोक्यावर हंडे घेऊन आंदोलनात आल्या. त्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी गावात येऊन माफी मागीतली होती.

हजारे पुढे म्हणाले की, मंदिरातील सेवा करत असताना आपलं गाव हे सुद्धा एक मंदिर असून जनता सर्वेश्वर आहे. त्या जनतेतील दुःखी पीडितांची सेवा ही खरी ईश्वराची पूजा आहे. यावेळी सहाय्यक व विक्रीकर आयुक्त डॉ. गणेश पोटे, उदयोजक सुरेश पठारे, माजी उपसरपंच लाभेष औटी, सुरेश दगडू पठारे, माजी सरपंच जयसिंग मापारी, उद्योजक भागवत पठारे, सुनिल हजारे दादा पठारे, डॉ. धनंजय पोटे, सुभाष पठारे, एकनाथ पठारे, गणेश हजारे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील हुशार व होतकरू मुलामुलींच्या उच्चशिक्षणात पैशांअभावी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सात – आठ व्यक्तींचा एक ट्रस्ट स्थापन करावा. गावातून 10 लाख लोकवर्गणी जमा झाली तर मी माझे स्वतःचे अडीच लाख रूपये या ट्रस्टसाठी देईल. दरवर्षी यातून मदत होऊन मुला – मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी सूचना यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपस्थित ग्रामस्थांना केली.

माणसाने आपल्या आयुष्यात लखपती होऊ द्या नाहीतर करोडपती होऊ द्या, फक्त स्वतः साठी जगणारी माणसं ही कायमचीच मरतात, करोडपती लखपती यांची कधीच जयंती साजरी होत नाही, तर समाजासाठी जे जगतात त्यांची होत असते. स्वत:साठी जगत असताना माझा शेजारी, माझा गाव, माझा समाज यांच्यासाठी माझं काही तरी कर्तव्य असल्याची जाणीव ठेवून जे जगत असतात ती माणसं खर्‍या अर्थाने जीवन जगत असतात. त्यातून मिळणार्‍या अखंड आनंदाला कुठलीही सीमा नाही.

– अण्णासाहेब हजारे, ज्येष्ठ समाजसेवक,

- Advertisment -

ताज्या बातम्या