Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारअण्णासाहेबांचे स्मारक सदैव प्रेरणा देईलः ना.फडणवीस

अण्णासाहेबांचे स्मारक सदैव प्रेरणा देईलः ना.फडणवीस

नरेंद्र बागले

शहादा Shahada ।

- Advertisement -

सहकारमहर्षी स्व.पी.के.अण्णा पाटील (Late PK Anna Patil) एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व (Inclusive personality) होते. त्यांच्या व्यक्तिमत्वातून समाज सुधारणेचे प्रतिबिंब उमटत होते. त्यांचे विचार, कर्तृत्व बघितले तर त्यांनी व्रतस्थ जीवन समाजाला वाहिले. पुरोगामी आचार, परिवर्तनवादी समाजसुधारक, देशभक्तीसोबत समाजभक्ती आणि पिडीत शोषित गटाला न्याय मिळवून देण्याचे महत्कार्य त्यांनी केले.

आदर्श समाज (Ideal society) घडविण्यासाठी त्यांनी समाजातील चुकीच्या प्रथा बंद करतांना शिक्षणाची गंगा आणली. विविध उद्योगधंद्यातून परिसरात रोजगार आणला. शेतकर्‍यांंना स्वाभिमानाने उभे राहता यावे म्हणून उपसा सिंचन योजना आणल्या, अश्या व्रतस्थ व्यक्तीच्या (monument always inspires the community) मिळेल असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी केले.

लोणखेडा (ता.शहादा) येथे सहकारमहर्षि स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्या ‘प्रेरक शक्तीची मूर्ती’ या पूर्णाकृती पुतळा अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.जयंतराव पाटील, पालकमंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी, पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, आ.अमरीशभाई पटेल, आ.राजेश पाडवी, आ.डॉ.विजयकुमार गावित, खा.रक्षा खडसे, आ.काशिराम पावरा, पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, माजी आ.शिरीष चौधरी, आ.डॉ.सुधीर तांबे, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, बबनराव चौधरी, विभागीय संघटन अनासपूरे, धुळे जि.प अध्यक्ष तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष भरत माळी आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ना.फडणवीस म्हणाले की, पुरोगामी विचारांची मुहूर्तमेढ स्व.अण्णासाहेबांनी केली. अण्णासाहेबांचा पुतळा नेहमी प्रेरणा देईल. ते समाज परिवर्तन करणारे व्यक्ती होते. चले जाव चळवळीतून प्रेरणा घेवून देशभक्तीतून समाज घडविण्याची भावना घेवून त्यांनी काम केले. लग्न समारंभातून एक नवी शिस्त लावताना नवा पायंडा पाडला. त्यातून समाजात आदर्श उभा राहिला.

चुकीच्या प्रथा बंद पाडण्याचे धाडस त्यांनी केले. शिक्षणातून समाज घडतो आणि यातून त्यांनी शिक्षणातून समृद्ध करण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केल्याने या भागातील तरुण शिकून सातासमुद्रापार गेला. समाजात नावलौकीक मिळविला. दुर्बल, शोषित पिडीत घटकांसाठी त्यांनी कार्य केले. त्यांनी विविधसंस्था उभ्या करुन रोजगार निर्मिती करीत शेतकर्‍यांना बाजारपेठ निर्माण करुन दिली.

समाजवादी विचारांकडे त्यांचा कल अधिक होता. चळवळींच्या माध्यमातून सशक्त समाज उभा केला. राजकारणातले एक आगळे वेगळे नेतृत्व स्व.अण्णासाहेब होते. पुतळा एक कार्य आहे. ते समाजाला नेहमी प्रेरणा देतात. समाजाला काहीतरी अर्पण करण्याची भावना ठेवली पाहिजे. त्यांनी उभ्या केलेल्या उपसा सिंचन योजना पुन्हा गतिमान करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले.

यावेळी ना.जयंतराव पाटील म्हणाले, स्व.पी.के.अण्णा स्पष्टवक्ते होते. सहकार चळवळीची कोणतीही नवी भूमिका शहाद्यातून असायची. हातात घेतलेले काम पूर्णत्वास आणायचे, हाच अण्णासाहेबांचा ठायी स्वभाव होता. शेतकरी जगला पाहिजे यासाठी उपसा सिंचन योजनांचा सपाटा त्यांनी लावला. एवढ्या झपाट्याने काम करणारा असा नेता महाराष्ट्रात अभावानेच घडतो. मोठ्या प्रमाणात या भागात सहकाराच्या माध्यमातून कामे झाले आहेत. उपसा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु. स्वाभिमानाने कसे जगावे याचा आदर्श अण्णांनी घालून दिला.

पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले, सातपुड्याच्या पायथ्याशी अण्णासाहेबांनी सहकार चळवळीचा पाया रचला.राजकारणात कसे असावे, नेहमी स्पष्ट बोलावे व कृती करावी, नुकसानीचा विचार न करता सरळ मार्ग अवलंबून जीवन जगावे याचा आदर्श अण्णांनी घालून दिला. अण्णासाहेब म्हणजे माणुसकीचा झरा असल्यानेच आज त्यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर जमले असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविक पी.के.अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.विजय शर्मा यांनी केले. आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी मानले. यावेळी श्री.पी.के.अण्णा फाउंडेशनचे सचिव प्रा.मकरंद पाटील, पी.आर.पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन विजय पाटील, पं.स.सभापती बायजाबाई भिल, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती जयश्री पाटील, माधवी पाटील, उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, पुरुषोत्तमनगरच्या सरपंच ज्योती पाटील, लोणखेडा उपसरपंच कल्पना पाटील, माजी सरपंच अशोक पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या