Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखकेवळ तीन महिन्यात आणखी एक साहित्य संमेलन!

केवळ तीन महिन्यात आणखी एक साहित्य संमेलन!

साहित्य हा समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय. सर्व विचार आणि विषयांच्या ज्ञानाचा महासागर. त्याला कोणताही विषय वर्ज्य नसतो. अलीकडच्या काळात राजकारण हा नवा स्पर्धक निर्माण होऊ पाहात आहे. सध्याच्या राजकारणालाही कोणताही विषय वर्ज्य राहिलेला नाही. राजकारण्यांचा साहित्य क्षेत्रातील वावर आणि साहित्य क्षेत्रातील राजकारण हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा विषय राहिला आहे. अगदी 1975 साली कराडला भरलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गाबाई भागवत यांनी यशवंतराव चव्हाण यांना संमेलनाच्या व्यासपीठावर येऊ दिले नव्हते. यशवंतरावांनीही ते खिलाडूपणे घेतले होते पण ‘मराठी साहित्याने आपले ‘मी पण’ विसरायला हवे’ अशी कोपरखळीही मारली होती. तात्पर्य राजकारण आणि साहित्यक्षेत्र यांचे नाते ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असेच म्हणावे का? की ग्रामीण वाक्प्रचाराप्रमाणे ‘चिखल पाण्याचे?’ अलीकडच्या काळात झालेल्या साहित्य संमेलनांमध्ये मात्र हे नाते अधिकाधिक घट्टच होत आहे. या दोन्हीचा संगम साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लोकांना पुन्हा एकदा नुकताच अनुभवता आला. उद्गीर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाला प्रामुख्याने ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार आणि नितीन गडकरी उपस्थित होते. पवार संमेलनाचे उद्घाटक होते तर गडकरींच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला. करोनाची बाधा नसल्यामुळे साहित्य संमेलन थाटामाटात झाले व वाजतगाजत पार पडले. दोन्ही अनुभवी नेत्यांनी समाजाच्या जडणघडणीतील साहित्य क्षेत्राच्या योगदानाची भरभरुन वाखाणणी केली. या क्षेत्राच्या उज्ज्वल परंपरेला उजाळा दिला आणि राजकारणाला अस्पृश्य मानण्याबद्दल चार कोपरखळ्याही मारल्या. ‘साहित्यिकांनी राज्यकर्त्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ नये. समाजात जे काही घडत आहे त्यासंदर्भात साहित्यिकांनी दक्ष राहायला हवे’ असे आवाहन शरद पवार यांनी केले. तर साहित्यिकांनी साहित्यातून देेशाचे भवितव्य रेखाटावे. त्यासाठी साहित्याच्या व्यासपीठावर राजकारण होऊ देऊ नये’ अशी मोठ्ठी जबाबदारी गडकरी यांनी साहित्यकांच्या खांद्यावर अलगद ठेवली. डॉ.जर्नादन वाघमारे, नीलम गोर्‍हे असे अनेक मान्यवर साहित्याच्या प्रेमापोटी संमेलनाच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनीही ज्येष्ठांच्या सुरात सुर मिसळले. हनुमान चालिसासाररखा प्राचीन काळातील मुद्दा शोधण्यापेक्षा साहित्य, साहित्यिक आणि राजकारणी हा नेहमीचा ताजातवाना विषयच संमेलनासाठी पुरेसा आहे असे त्यांना वाटत असावे. हनुमान चालिसा म्हटली तरी आक्षेप, म्हटली नाही तरी आक्षेप. कोणत्याही चांगल्या विषयाचा विचका कसा करायचा यात तर नेतेमंडळींचे नैपूण्य कोण नाकारणार? तात्पर्य, साहित्य क्षेत्र व राजकारणी यांचे परस्परसंबंध लोकशाहीतील समाजाला मार्गदर्शक ठरावेत. राजकारणापासून कोण अलिप्त राहाणार? राजकारण ही गुळाची भेलीच आहे. ज्याला संधी मिळते तो त्याची चव चाखणारच. ती चव चाखण्यासाठी कोणी मुंबईहून गोव्यात जाते तर कोणी कोल्हापूर व पुण्यात. इतर कोणी मुंबईत येते तर कोणाला खळखट्याक करण्यात रस असतो. तेव्हा साहित्य आणि राजकारणी यावर संमेलनांमध्ये अनुकूल प्रतिकूल ठराव मांडले जातील आणि संमतही होतील. तेसुद्धा एकमताने! कारण साहित्य क्षेत्रातील ठराव ही सुद्धा औपचारिक परंपरा बनू पाहात आहे. संमेलनाच्या वेळीच त्याबद्दल सारा दिवस माध्यमातून वादविवादाचे वादंग चालू राहिल तेवढेच त्या ठरावाचे महत्व. नंतर त्याची कधी अंमलबजावणी झाल्याचा अद्याप इतिहास नाही. संमेलनासाठी निवडलेल्या अध्यक्षांपैकी माध्यमांशी मैत्री असलेल्यांचे नाव अधुनमधून माध्यमांमध्ये झळकत राहाते एवढेच हे साहित्य संमेलनांचे फलित!

- Advertisment -

ताज्या बातम्या