नवी दिल्ली हे देशाच्या राजधानीचे शहर! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले असताना दिल्लीच्या उत्तर-पूर्व भागात दंगल पेटली. त्यात लोक भरडले गेले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला होणार्या विरोधाने तीन दिवस हिंसक रूप धारण केले. अनेकांचा जीव गेला. अनेकांची घरे जळाली. आता दिल्ली पुन्हा सावरत आहे.
प्रमोद मुजुमदार
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी राजधानी नवी दिल्ली नटत होती, सजत होती. त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात होत्या. तिकडे शाहीन बागेत नागरिकता सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन शांततेत सुरू होते. सगळे काही सुरळीत सुरू आहे असे वाटत असतानाच उत्तर पूर्व दिल्लीत हिंसा सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दिल्लीच्या शांततेला ग्रहण लागले. राजधानीचा उत्तर पूर्व भाग पेटू लागला. हिंसेने रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आणि सगळे होत्याचे नव्हते झाले. एकीकडे ट्रम्प दिल्लीत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत होते, त्यांच्यासाठी शाही मेजवानीचे आयोजन होत होते तर दुसरीकडे उत्तर पूर्व दिल्ली जळत होती. या भागात तुफान दगडफेक सुरू होती. पेट्रोल बॉम्बचा वापर होत होता. सुरक्षारक्षकांवर अॅसिडही फेकले जात होते. पोलिसांवर बंदुका रोखल्या जात होत्या. दगडांनी ठेचून मारले जात होते. ही अचानक उसळलेली दंगल वाटतच नव्हती. राजकारण्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे ही दंगल उसळल्याचा आरोप होत असला तरी आम्हा दिल्लीकरांना या सगळ्या प्रकारामागे सुनियोजित कटाचा दर्प येत होता. बहुदा दंगलखोरांना,
समाजकंटकांना ट्रम्प यांच्यासमोर आणि पर्यायाने जगासमोर देशाची प्रतिमा मलिन करायची असावी. म्हणूनच या दंगलींसाठी त्यांच्या दौर्याचा मुहूर्त शोधण्यात आला असावा. मात्र ट्रम्प यांनी या दंगलींकडे पाहिलेही नाही, मोदींना फटकारले नाही. त्यामुळे दंगलखोरांचा, किंबहुना या देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी टपलेल्यांचा हिरमोड झाला.
उत्तर पूर्व दिल्लीत लोकसंख्येची घनता शहराच्या इतर भागांच्या तुलनेत अधिक आहे. इथल्या प्रत्येक चौरस किलोमीटर परिसरात 29,397 लोक राहतात. इथले बरेचसे नागरिक छोटा-मोठा उद्योग करून उदरनिर्वाह करतात. गवंडीकाम, सुतारकाम तसेच इतर कुशल कामे करणार्या कामगारांची वस्ती या भागात आहे. विविध राज्यांमधील पोलीस या भागात धाडी टाकतात. गुन्हेगारांच्या तसेच वाहनचोरांच्या शोधासाठी इथे येतात. या भागात सर्व समाजातील, सर्व स्तरातील लोकांची वस्ती आहे. काही दुकाने, इमारतींची मालकी हिंदूंकडे आहे. त्यांनी मुस्लीम व्यापार्यांना दुकाने भाड्याने दिली आहेत. तर मुस्लीम मालकांनी आपली दुकाने हिंदू समुदायातल्या लोकांना वापरायला दिली आहेत. या भागात बर्याच अंशी सलोख्याचे, एकोप्याचे वातावरण पाहायला मिळायचे. आठवडाभरापूर्वी इथे सगळे आलबेल होते.
आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे, याची कोणाला कल्पनाही नसावी. रविवारपासून या भागात दंगेखोरांच्या हैदोसाला सुरुवात झाली. भजनपुरा, चांदबाग, मौजपूर, गोकुलपुरी, चांदबाग, जाफराबाद, मुस्तफाबाद हे भाग होरपळून निघाले, नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधानिमित्त शहरातला शाहीन बाग हा भाग जगाच्या नकाशावर आला. उत्तर पूर्व दिल्लीकडे कोणाचे लक्षही गेले नव्हते. पण आता दंगलींमुळे संपूर्ण जगाने या भागाची दखल घेतली.
ट्रम्प यांच्या दौर्यानिमित्त दिल्लीचा पोलीस विभाग त्यांच्या सुरक्षेच्या कामात व्यस्त होता आणि हीच संधी साधून मोठ्या प्रमाणात दंगल घडवण्यात आली. पोलीस, प्रशासन बेसावध असतानाच हाहाकार माजवण्यात आला. इमारतींच्या बेसमेंटमधल्या मोटारींना आगी लावण्यात आल्या. वाहनांचे शोरूम्स फोडून तिथे आगी लावल्या गेल्या. दुचाकी वाहनेही जळू लागली. भंगारची दुकाने, टायरची दुकाने, बाजारपेठांमध्ये पेट्रोल, डिझेल, रॉकेल अशा ज्वलनशील घटकांचा वापर करून आगी लावण्यात आल्या. बरीच जाळपोळ करण्यात आली. बुधवारीही उत्तर पूर्व दिल्लीच्या आसमंतात जाळण्यात आलेल्या वाहनांचा, टायरचा दर्प भरून राहिला होता. धुराचे लोळ उठत होते. वातावरणात एक प्रकारचे नैराश्य दाटून आले होते. प्रचंड उदासीनता होती. उत्तर पूर्व दिल्लीकडे जाणार्या रस्त्यांवर दगडांचा खच पडला होता. औषधांच्या दुकानांसह परिसरातील सगळी दुकाने बंद होती. शाळांनाही कुलुपे लावण्यात आली होती. इथल्या लोकांच्या डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसून येत होती. तणावपूर्ण शांतता म्हणजे काय, याची अनुभूती या भागात फिरल्यानंतर येत होती.
तीन दिवसांच्या हिंसाचारानंतर बुधवारी दिल्लीतील वातावरण निवळायला सुरुवात झाली असली तरी दंगलग्रस्त भागातील गल्ल्यांमध्ये तरुणाई गटागटाने बसून असल्याचे चित्र दिसून येत होते. दंगल झालीच तर स्वत:च्या बचावासाठी काय करायचे याबाबतच्या चर्चा कानांवर पडत होत्या. दंगलखोरांनी विद्युतपुरवठा करणार्या वायर्सही जाळून टाकल्या होत्या. त्यामुळे बर्याच भागातला विद्युतपुरवठा बंद होता. परिसरातल्या व्यापार्यांचे, दुकानांचे बरेच नुकसान झाले होते. हे नुकसान कसे भरून काढायचे, याची चिंता व्यापार्यांच्या चेहर्यावर दिसून येत होती. इथल्या लोकांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये एवढा हिंसाचार आणि दंगली अनुभवल्या नव्हत्या. आपण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंगली अनुभवल्याचे 1993 पासून या भागात राहणार्या नागरिकांनी सांगितले.