शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबांनी दिलेल्या नऊ नाण्यांच्या सत्यतेचा दावा करताना साईबाबा विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या विरोधात शिर्डीत ग्रामस्थ एकवटले आहेत. गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी शिर्डीतील मारुती मंदिरासमोर निषेध सभा घेतली. यानंतर गायकवाड यांच्या दुकानावर आणि घरावर जाऊन त्यांना शिर्डीतून बाहेर काढण्याची मागणी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी गायकवाड यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल केली.
साईबाबांनी महानिर्वाणाच्या वेळी भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नवविद्या भक्तीचे प्रतीक म्हणून चांदीची नऊ नाणी दिली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे आणि गायकवाड कुटुंबे ही नाणी आपल्याकडेच असल्याचा दावा करत आहेत. यामुळे 22 नाणी समोर आल्याने वाद अधिकच चिघळला आहे. काही दिवसांपूर्वी शिर्डीतील ग्रामस्थांनी गायकवाड यांच्या ट्रस्टची चौकशी करण्याची मागणी केली होती.
मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी नऊ नाण्यांच्या सत्यता पडताळणीसाठी साईबाबांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. यामुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. समाजमाध्यमांमध्ये या वक्तव्याविरोधात संतापाची लाट उसळल्यानंतर गायकवाड यांनी रात्रीच माफीनामा जाहीर करत चुकून बोललो असल्याचे म्हटले होते. मात्र यामुळे ग्रामस्थांचा संताप कमी झाला नाही. बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी मारुती मंदिरासमोर निषेध सभा घेऊन अरुण गायकवाड यांचा निषेध केला.
यावेळी उपस्थित नागरिकांनी गायकवाड यांना शिर्डीत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे म्हटले. तसेच शिंदे परिवाराने आपल्याकडील नऊ नाणी साईसंस्थानकडे जमा करण्याची तयारी दर्शवली आहे. गायकवाड यांच्याकडूनही नाणी जमा करून त्यांची सत्यता पडताळावी आणि खरी नऊ नाणी संस्थानच्या वस्तू संग्रहालयात दर्शनासाठी ठेवावीत, अशी मागणी करण्यात आली. सभेनंतर नागरिकांनी गायकवाड यांच्या घरावरही मोर्चा नेला आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला. तसेच गायकवाड यांना भाड्याने दिलेले दुकानही खाली करून घेण्याचा निर्णय संबंधित मालकांनी घेतल्याचे सांगण्यात आले.
माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात अरुण गायकवाड यांच्या वक्तव्याच्या संदर्भात फिर्याद देत कारवाईची मागणी केली. या फिर्यादीत कमलाकर कोते, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, सचिन तांबे, निलेश कोते, बाबासाहेब कोते, सर्जेराव कोते, संजय शिंदे, नितीन कोते, ताराचंद कोते, सुजित गोंदकर, संदिप सोनवणे, दीपक वारुळे, योगेश जगताप, प्रमोद गोंदकर, कैलास आरणे, किरण बडे, अविनाश गोंदकर, प्रसाद लोढा, विकास गोंदकर, अनुप गोंदकर, राजेंद्र भुजबळ, गणेश कोते, सचिन कोते, नरेश सुराणा, विनोद गोंदकर, विरेश चौधरी, प्रतिक शेळके यांच्यासह ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे म्हटले आहे.
साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना चांदीची नऊ नाणी दिली होती, परंतु आता 22 नाणी समोर येत असल्याने शिंदे आणि गायकवाड कुटुंबांना यापूर्वीच नोटिसा दिल्या होत्या. अरुण गायकवाड यांचे वक्तव्य चुकीचे असून कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल.
– गोरक्ष गाडीलकर, सीईओ, साईबाबा संस्थान




