मुंबई | Mumbai
उद्धव आणि राज ठाकरे महाराष्ट्र, मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. येत्या ५ जुलै रोजी ठाकरे बंधु हिंदीसक्तीविरोधात मोर्चा काढणार आहे. या मोर्चात सगळ्या मराठी माणसाने सामिल होण्याचे आवाहन केले आहे. तत्पुर्वी या मोर्चावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाक् युध्द जुंपले आहे. आता या मुद्द्यावर जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दोन वर्षांपुर्वी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. यादरम्यान आशा भोसले एकनाथ, शिंदे, आशिष शेलार, राज ठाकरे यांच्यासोबत मंचावर एकत्र आल्या होत्या. सध्या राज्यात हिंदीसक्तीवरुन वातावरण तापलेले असताना आशा भोसले यांना त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी दिलेल्या प्रश्नाची सध्या चर्चा रंगलीय.
आशा भोसले आर. डी. बर्मन यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आल्या होत्या.या वेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार देखील तिथे उपस्थित होते. याचवेळी आशा भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. माध्यम प्रतिनिधींनी त्यांना सध्याच्या राजकीय क्षेत्रातल्या चर्चेवर प्रश्न विचारले. यावर ‘मी फक्त आशिष शेलार यांनाच ओळखते, इतर राजकारण्यांना मी ओळखत नाही’, असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.
सध्या सर्वत्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटते? असे आशा भोसले यांना विचारले असता, त्यांनी मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते, इतर कोणत्या राजकारण्याला मी ओळखत नसल्याचे म्हटले. तसेच सध्या चर्चेत असलेल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलणेही त्यांनी टाळले. मी कोणत्याच राजकीय मुद्द्यावर बोलणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशा भोसले यांचे घरचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये अभिजात पुस्तक प्रदर्शन कार्यक्रमात राज यांनी आशा भोसलेंना निमंत्रित केले होते. त्याआधी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचा किस्सा आशा भोसलेंनी सांगितला. “मराठी भाषा इतकी गोड, लवचिक आहे. मधाचा थेंब कानात पडल्यानंतर ओघळत ह्रदयापर्यंत जाऊन पोहोचतो अशी ही भाषा आहे. या भाषेला दुधारी तलवारही आहे आणि अवधान जर नाही ठेवले तर काहीही अर्थ निघून जातो. ऱ्हस्व, दीर्घ सगळे काही पाहावे लागते. चार-पाच दिवसांपूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला. ते फार उत्साहात होते. ते मला त्यांच्या ठाकरे आवाजात म्हणाले, आशाताई मला तुम्ही २७ तारखेला काही झाले तर संध्याकाळी ६ वाजता हव्यात. मी त्यांना म्हटले, ’60 वर्षं उशीर झाला बरे का’. त्यावर त्यांनी काव्यवाचन करायचे आहे आणि जरुर यायचे आहे असे सांगितले,” असा किस्सा आशा भोसले यांनी सांगताच सर्वांना हसू अनावर झाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




