Thursday, May 2, 2024
Homeनगरआशा व गटप्रवर्तकांचे करोनातील काम कायम स्मरणात राहील- डॉ.सौ. तनपुरे

आशा व गटप्रवर्तकांचे करोनातील काम कायम स्मरणात राहील- डॉ.सौ. तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

करोनाकाळात आशा व गट प्रवर्तक यांनी आपल्या जिवाची कुटुंबाची पर्वा न करता केलेले काम महाराष्ट्रातील जनता कायम स्मरणात ठेवील, असे गौरवोद्गार राहुरीच्या माजी नगराध्यक्षा डॉ.सौ. उषाताई तनपुरे यांनी काढले.

- Advertisement -

अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राहुरी तालुका सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सीताराम लांबे होते. अहमदनगर जिल्हा आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने आशा व गट प्रवर्तक यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सौ.तनपुरे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ज्यावेळेस करोना झालेल्या रुग्णाच्या त्याच्या घरातील लोक जवळ जात नव्हते. अशा वेळेस तुम्ही प्रत्येक घरात जाऊन त्या रुग्णांचा शोध घेऊन त्याला धीर देत होत्या. त्याच्यावर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जात होत्या, हे खूप महत्त्वाचे काम तुम्ही केले आहे. तुमच्या संघटनेने तुम्हाला दिलेला कोविड योद्धा हा सन्मान खरोखर तुमच्या कामाला साजेसा आहे. तुमच्या मानधना संदर्भात मी शासकीय पातळीवर जे काही करता येईल, ते निश्चीत करील.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. दिपाली गायकवाड यांनी करोनाकाळात आशांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली. तुम्ही केलेले काम उल्लेखनीय आहे. त्याचेच फळ म्हणून आज राहुरी तालुका शंभर टक्के करोनामुक्त झाला आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्तविक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सेक्रेटरी अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर यांनी तर सूत्रसंचालन जिल्हा संघटक कॉ. सुरेश पानसरे यांनी केले. आभार सौ. शहाताई शिंदे यांनी मानले.

कार्यक्रमास कॉ. ज्ञानदेव गायकवाड, यमुना गव्हाणे, संगीता घोडके, मिना गोपाळे, निलीमा क्षीरसागर, सुचित्रा ढोकणे, ललिता खेमनर, निलम बाचकर, गायत्री मोरे, गौरी पवार, योगीता काळे, चंद्रकला शिंदे, उषा दिघे, अनिता साबळे व आशावर्कर उपस्थित होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या