Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीची भावदिंडी : भाग ९ - विष्णुसहित शिव आणिला पंढरी!

आषाढीची भावदिंडी : भाग ९ – विष्णुसहित शिव आणिला पंढरी!

 

नंदन रहाणे

- Advertisement -

एखाद्या डोंगराळ खोर्‍यात पाऊस पडला की सगळ्या कड्यांवरून धबधबे खाली आदळू लागतात. उतारांवरून पाण्याचे लोंढे धावत सुटतात. त्यांचे झरे बनून खळखळाट करीत एकमेकांमध्ये मिसळतात. मग त्यांचे बनतात ओहोळ, तेही 5-7 मैल वाहात जाऊन आणखी मोठ्या धारेत शिरतात. ती असते नदी, जी अशा अनेक प्रवाहांना पोटात घेत पुढे पुढे सरकते आणि 70-80 मैल म्हणाकी 130-150 मैल म्हणा… दुरवरच्या आणखी मोठ्या नदीशी संगम पावते! अशा अनेक महानद्या सरतेशेवटी समुद्रापाशी जाऊन त्यात विलीन होतात! वारकरी संप्रदायात ज्येष्ठाचा उत्तरार्ध आणि आषाढाचा पूर्वार्ध अगदी असाच असतो… गावोगावचे भक्तभाविक निघतात त्यांच्या दिंड्या बनतात. त्या संतांच्या पालखी सोहळ्यात सामील होतात. असे सर्व सोहळे वाखरीला एकत्र येतात आणि मग तिथला भक्तीसमूह पंढरपुरात शिरतो! वारीची आनंदयात्रा तिथे सुफळ संपूर्ण होते!

YouTube video player

पंढरपूरला काय आहे एवढे… की ज्याच्यासाठी हे लाखो लोक शतावधी योजनांचे अंतर पायी पार करून तिथे पोचतात? तिथे आहे पांडुरंग.. एका विटेवर उभी असलेली एक लहानशी दिगंबर लहानशी दिगंबर मूर्ती! ती दर्शनार्थी जनांच्या वाट्याला येते तरी किती वेळ? फार तर फार 2 ते 3 सेकंद! तेही दर्शन सर्व वारकर्‍यांच्या नशिबात नसते… पंढरपुरात पोचलेल्या 4/5 जणांपैकी फार तर 1 भाविकच विठ्ठलमूर्तीपाशी जाऊ शकतो.. तरीही दर्शन न झालेलेही तितकेच तृप्त व आनंदी असतात! कारण, त्यांचा देव ते जे समूहजीवन आकाराला आणतात, त्यातूनच त्यांना दर क्षणाला, दर पावलाला भेटत असतो! त्याच्या आणि संतांच्या नावाच्या उच्चारातच तो सामावलेला त्यांना जाणवतो… तो केवळ पांडुरंग नसतो तर विष्णूही असतो आणि शिवही असतो! या दैवताशी पंथभेद नाहीत, वर्णजातीभेद तेही नाहीत… अन त्याच तत्वाचा बोध घेऊन वारकरी जगत असतात..

पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरी।
नाही चराचरी । ऐसा कोणी ॥1॥
विष्णूसहित शिव आणिलासे पंढरी।
केले भीमातीरी। पेरवणे जेणे ॥2॥
ब्रह्मादिकां अंत न कळे रूपाचा।
एवढी कीर्ती वाचा ।
बोले काय ॥3॥
निवृत्ती सांगे मात, विढ्ढल उच्चरे।
वैकुंठ उतरे।
एक्या नामे ॥4॥

योगीराज निवृत्तिनाथांंचा हा अभंग आहे. अगदी 8-10 वर्षाचे असतांनाच त्यांना त्र्यंबकेश्वरी एक गुहेत नाथसंप्रदायाची दीक्षा मिळाली. गहिनीनाथ हे त्यांचे गुरू त्यांनी केलेल्या उपदेशामुळे या लहानग्या मुलाचे रूपांतर ‘योगी निवृत्तीनाथ’ अशा विभुतीत झाले. धाकटे बंधू ज्ञानदेव हे त्यांचे शिष्य बनले. साहजिकच नामदेवापासून नरहरीपर्यंतचे सगळे संतही त्यांना गुरूस्थानी पाहू लागले. नामदेव प्रणित संतमंडळात त्या सर्व भावंडांचा प्रवेळ 1291 साली झाला व दिव्य तत्वज्ञानाची बैठक संतांच्या कार्याला मिळाली. निवृत्तीनाथांनी या विठ्ठलातच शिवही असल्याचे सांगून महाराष्ट्रात शैव अन वैष्णव यांच्यातील वादाचे मुळच खंडून टाकले! ते म्हणतात अहो, या पंढरीत हा विलक्षण देव पुंडलिकाने आणला, काय त्याचे भाग्य सांगू? या सगळ्या चराचरात त्याच्यासारखा अजरामर कोणीच नाही! त्याने विष्णूसहित शिवही इथे आणून त्याच्या ऐक्याची पेरणी भीमातीरी केली. इथली ही विठ्ठलमूर्ती फारच अदभूत आहे. तिचा रूपाचा विस्तार अनंत आहे, ज्याचा शेवट ब्रह्मा व इतर देवही जाणू शकत नाहीत!

जो वैष्णव असेतल त्याला या मूर्तीत विष्णू दिसेल, तर जो शैव असेल त्याला इथे शिवदर्शनाचे समाधान मिळेल. हा अनुभव अनेकांनी घेऊन पाहिलाय… तशी कीर्ती पण गायली आहे. मी माझ्या वाचेने ती कुठवर वर्णन करू? मी निवृत्त झालेला याचा भक्त तुम्हाला सांगतोय की तुम्ंही फक्त विठ्ठल विठ्ठल असा उच्चार करा आणि भवसागर पार करून वैकुंठ प्राप्त करून घ्या!

ताज्या बातम्या

Parth Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, पार्थ पवारांबाबत महत्त्वाचा निर्णय

0
मुंबई । Mumbai राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवारांनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची...