पंढरपूर । Pandharpur
आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल रखुमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली.
यंदाच्या वर्षी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबासना या गावचे बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. शासकीय महापूजा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
मागील १६ वर्षांपासून हे दाम्पत्य वारी करत आहेत. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाचे वारकरी म्हणून दर्शन रांगेतून शेतकरी भाविकाची निवड केली जाते. त्याच पद्धतीनं अहिरे दाम्पत्याची निवड करण्यात आली.
सावळ्या विठुरायाच्या दर्शना नंतर भाविक आनंदी झाले. राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, श्री विठ्ठलाची वारी हा आनंदाचा दिवस. सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मला मिळाला. हा पांडुरंगाचाच आशीर्वाद आहे. गेल्या वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या ३० टक्क्यांहून अधिक वाढली असून राज्य सरकारने अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करत आहे. तर, मंदिर समितीने केलेल्या मागण्याबद्दल हे सरकार नक्कीच सकारात्मक निर्णय घेणार आहे. अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.