चारुदत्त आफळे, ज्येष्ठ निरुपणकार
आषाढी एकादशी ही विठ्ठल भक्तांसाठी पर्वणी. विठ्ठल ‘लोकदेव’ आहे. तो सर्वांना स्वीकारणारा आणि सर्वांनी स्वीकारलेला आहे. विठ्ठल घराघरांमध्ये पोहोचलेला आहे. कारण संतांनी आईच्या रूपात त्याचे स्वरूप आपल्यासमोर मांडले आहे. देव, वडील वा गुरूंना समजून घेण्यास विद्वत्तेची, योग्यतेची गरज असते. मात्र आईजवळ जाण्यासाठी अपार प्रेम एवढीच गोष्ट पुरेशी असते. आज त्याचीच प्रचिती येते.
विकांसाठी आषाढी एकादशीचा दिवस पर्वणीपेक्षा कमी नाही. आपल्याकडे वारीची परंपरा हजार वर्षांपासून दिसते. कारण आपले वडीलदेखील वारीला जात होते आणि त्यांनीच आपल्याला वारीच्या सोहळ्यात समाविष्ट करून विठ्ठल भक्तीच्या परंपरेमध्ये सामावून घेतले, असा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तिनाथांच्या अभंगांमध्ये आढळतो. संत नामदेवांच्या घरातही वारी आहे आणि तुकोबांच्या घरी तर आहेच आहे. तेव्हा सगळ्या संतांच्या जीवनात वारीचा उत्सव दिसतो.
वारीचे आताचे रूप तुकोबांचे चिरंजीव नारायण महाराजांपासून दिसू लागले, असे म्हटले जाते. त्याचे काही ठळक उल्लेख इतिहासात मिळतात. नारायण महाराजांनी तुकोबा आणि ज्ञानेश्वरांच्या पादुका एकत्र घेऊन वारीचा दंडक सुरू ठेवला. वारी एकाच मार्गाने जात असल्यामुळे बरेच लोक सोहळ्याच्या सेवेपासून वंचित राहत होते. ही अडचण लक्षात घेऊन पुढे दोन मार्ग करण्यात आले आणि संत ज्ञानदेव आणि तुकोबांच्या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरला पोहोचू लागल्या. अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेणे, हा यामागचा हेतू होता. आजही महाराष्ट्रातील 40 ते 50 क्षेत्रांमधील दिंड्या एकत्र येतात आणि परंपरेचे पालन करत सोहळा पार पडतो.
पूर्वपीठिका अशीच सांगितली जाते की, पुंडलिक नावाचे ऋषी पंढरपुरामध्ये तपश्चर्या करत होते. त्यांना भेटण्यासाठी गोपालकृष्ण तिथे आले. पण आम्ही तुझी तपश्चर्या करायची आणि मग तू इथे येऊन दर्शन द्यायचे असे न करता तू कायमस्वरुपी इथे राहा, म्हणजे आम्हाला तुला केव्हाही भेटता येईल, असा आग्रह पुंडलिकाने धरला आणि देवाने त्याचा स्वीकारही केला. या कथेनुसारही पुंडलिकाने देवाला मित्र, सखा केल्याचे दिसते. भाविकांना तो अगदी जवळचा वाटण्यामागे हेदेखील एक कारण म्हणता येईल. इथे सगळेजण येऊन प्रसंगी विठ्ठलाशी भांडतात, उराउरी भेटतात, त्याला लेकुरवाळा करतात. आईपाशी असतो तोच मोकळेपणा त्यांना त्याच्या ठायी जाणवतो.
वारीत शिस्त आहे, परंपरेचे पालन आहे तसेच अत्यंत साधेपणाही आहे. यानिमित्ताने समाज एकत्र येतो. एकमेकांमध्ये मिसळून जातो. खरे तर हा एक संस्कार सोहळा आहे, असेच म्हणता येईल. भाविक सर्व असुविधांचा स्वीकार करून आपल्या भक्तीचे, प्रेमाचे प्रगटीकरण करतात. भगवंताच्या उपासनेत रममाण होतात. तसे बघायला गेले तर वारीतील उपासना खूप कडक असते. नियम काटेकोरपणे पाळले जातात. ठराविक वेळी आरती, कीर्तने होतात. उपासनेची ही कठोरता पाळताना प्रत्येक वारकरी सुविधेकडे लक्ष न देता ईश्वरावरील भक्तीला प्रथम स्थान देतो. वारीच्या निमित्ताने याचा संस्कार आणि सराव होतो.
वारीबद्दल ज्ञानेश्वरांचा एक वेगळा विचारही लक्षात घेण्याजोगा आहे. ‘अवघाचि संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक’ असे ते म्हणतात. इथे आईने म्हणजेच विठ्ठलाने मला सासरी सुखाचा संसार करायला पाठवले आहे, असे ते सांगतात आणि तो किती सुखाचा केला हे सांगण्यास दरवर्षी मी तिच्याकडे जातो, असे स्पष्ट करतात.
जाईन गे माये तया पंढरपुरा,
भेटेन माहेरा आपुलिया…
म्हणजेच वर्षभरात कोणते चांगले काम केले, किती जणांना सन्मार्गी लावले, किती जणांना संस्कारी केले, सजग केले हे सांगण्यास मी पंढरीला जातो. विठ्ठलाला याबाबत सांगणे ही माझी जबाबदारी आहे, असे ते स्पष्ट करतात. ज्ञानदेवांनी वारीला इतके गोड रूप दिले आहे. समाजामध्ये निकोप वातावरण निर्माण करण्यासाठी अशा विचारांचा फार मोठा उपयोग झाला आणि यापुढेही करून घेता येईल. जातीपातीचा, कर्मकांडाचा विचार न करता विठ्ठलभक्तीसाठी एकत्र येण्याचा संस्कार वारीने आपल्याला दिला आहे. म्हणूनच ही संस्काराची वारी आहे. इथे प्रत्येक जण एकमेकांना ‘माऊली’ म्हणूनच हाक मारतो. विठाई माऊली आणि ज्ञानेश्वर हीदेखील माऊलीच…
‘क्रोध अभिमान गेला पावटणी’, असे तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा वाळवंटी मांडलेल्या खेळात आम्ही केवळ मातीच तुडवली नाही तर राग, अभिमान तुडवला, असे ते स्पष्ट करतात. त्यामुळेच
एक एका लागतीय पायीं रे…असे दृश्य दिसते. इथे कोणी कोणाचे शिक्षण, रंगरूप, वय असे काहीही पाहत नाही. सगळे एकमेकांना नमस्कार करतात. पाया पडतात. तुकोबांनी भक्ताची वेशभूषा कशी असते हेदेखील सांगितली आहे.
गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा
हार मिरविती गळा
असे वर्णन ते करतात. वारकर्यांची ही एक महत्त्वाची ओळख आहे. पुढे ते
वर्ण अभिमान विसरती याती
एकएकां लोटांगणी जाती
असे म्हणतात. यावेळी वर्ण हा शब्द कार्यवाचक म्हणून घेतला तर लोक आपला वर्ण विसरले नाहीत पण त्याचा अभिमान विसरले, असेच तुकोबा स्पष्ट करतात. म्हणजेच मी हे काम करतो म्हणून तुझ्या वर आहे आणि तू हे काम करतो म्हणून माझ्यापेक्षा खालच्या पायरीवर आहे, हा विचार वा ही भावना विसरणे हे वारीचे संस्कार आहेत, असे म्हणायला हरकत नाही. इथे सगळेच एकसमान असतात.
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें
पाषाणा पाझर सुटती रे
असे म्हणताना तुकोबांनी वारीमुळे भाविकांची, वारकर्यांची चित्ते लोण्यासारखे मऊ व्हावीत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. वारी अशीच आहे.





