मुंबई | Mumbai
भाजपने (BJP) राज्यसभा उमेदवारांची (Rajya Sabha Candidates) नवी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ.अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेसाठी ज्यांच्या नावाची चर्चा होती त्या पंकजा मुंडेंचे (Pankaja Munde) नाव मात्र यादीतून वगळण्यात आले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपचे महाराष्ट्रातील तीन उमेदवार अद्याप निश्चित झालेले नव्हते. मात्र, आज तीन नावे जाहीर करण्यात आली आहेत…
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी कालच (१३ फेब्रुवारी) भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्या काहीशा नाराज होत्या. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडेही आपली नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आज राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपने एकप्रकारे त्यांची नाराजी दूर केल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कुणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे महायुतीकडून आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झाली आहे. तसेच कॉंग्रेसकडून महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी हंडोरे यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे.