Tuesday, February 3, 2026
HomeनगरShrirampur : अशोकच्या सभेत अभुतपूर्व गोंधळ; जोरदार घोषणाबाजी

Shrirampur : अशोकच्या सभेत अभुतपूर्व गोंधळ; जोरदार घोषणाबाजी

शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. काळे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त भोसले व माजी आ. मुरकुटे यांच्यात शाब्दीक चकमक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विधीज्ञ अजित काळे, जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांना बोलण्यास मज्जाव केल्याने चांगलाच गोंधळ निर्माण झाला, त्यामुळे उपस्थित सभासदांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सर्व सभागृह दणाणले, शेवटी शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. अजित काळे यांनी सभात्याग करुन सभागृहाबाहेरच सभा घेऊन आपला निषेध नोंदवला.

- Advertisement -

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा अशोकनगर येथील निवृत्तीभाऊ बनकर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान चेअरमन, माजी आ. भानुदास मुरकुटे होते. यावेळी व्हाईस चेअरमन बाबासाहेब आदिक, ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, हिम्मतराव धुमाळ, ज्ञानेश्वर शिंदे, पुंजाहरी शिंदे, प्रताप भोसले, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटारे, गिरीधर आसने, ज्ञानेश्वर काळे, विरेश गलांडे, आदिनाथ झुरळे, अमोल कोकणे, अच्युतराव बडाख, सिद्धार्थ मुरकुटे, मंजुश्री मुरकुटे, निरज मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ. वंदना मुरकुटे, प्रा. डॉ. सुनिता गायकवाड, कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष देवकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

YouTube video player

सभेच्या सुरुवातीलाच साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त प्रताप भोसले यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र मुरकुटे यांनी त्यांना माझ्या परवानगीशिवाय बोलता येणार नाही, असे सांगत त्यांना खाली बसवले. त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. देवकर यांनी सभेपुढे येणारे विषयांचे वाचन केले. विक्रांत भागवत यांनी मागील सभेचे इतिवृत्ताचे वाचन केले. यावेळी प्रताप भोसले म्हणाले की, कारखान्याने वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था काढल्या, हा निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे. या कारखान्यासाठी आमची भावनिक गुंतवणूक आहे. वार्षिक अहवालामध्ये सरकारकडून येणे 25 कोटी रुपये दाखवले. मात्र, ते पाच कोटी रुपये आहे. याबाबत लेखापरीक्षकाने त्यामध्ये तसे नमूद केले आहे. हे खोटे असेल तर माझ्यावरती श्री. मुरकुटे यांनी दावा ठोकावा, असे सांगितले. आता श्री. मुरकुटे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे, आम्ही पदरमोड करू, पण कारखान्याच्या सभासदांना 3500 रुपये भाव देऊ, माझी या कारखान्याशी भावनिक गुंतवणूक आहे.

अशोक कारखाना तालुक्याची कामधेनू आहे. हा टिकला पाहिजे, गरज वाटली तर आम्ही यासाठी पदरमोड करु, असेही श्री. भोसले म्हणाले. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विधीज्ञ अजित काळे म्हणाले की, प्रताप भोसले यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे, ऑडिटरने चुका दाखवल्या आहेत, त्या मान्य कराव्या लागतील, संस्था चालवताना भूमिका राजकीय नसावी, अशोकलाच ऊस द्या, अशी आमची भूमिका आहे, परंतू आजूबाजूच्या कारखान्याप्रमाणे येथील सभासदांनाही भाव द्या, असे सांगून काळे म्हणाले, अशोकच्या कार्यक्षेत्रात सात ते आठ लाख टन ऊस असताना, आपण फक्त चार ते पाच लाख टन गाळप करतो. बाहेर ऊस देण्याचा हा नवीन व्यवसाय तुम्ही सुरू केलाय काय? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला.

आम्ही गावोगावी जाऊन सांगतो, अशोकला ऊस द्या, तुम्ही फक्त चांगला भाव द्या, बाहेरून ऊस आणू नका, तुम्ही बाहेरचा ऊस घेऊन दुसरीकडे देता, हा नवीन व्यवसाय आहे का? या कारखान्याचे पतमुल्य संपलेले आहे. जिल्हा बँक तुम्हाला दारात उभं करायला तयार नाही, कामगारांचे आठ महिन्यांपासून पगार दिले नाहीत. आम्हाला तीन हजार भावही मान्य नाही, 3300 रुपये प्रमाणे सभासदांना भाव द्या, आम्ही तुमच्या सोबत येऊ, असे आवाहन त्यांनी श्री. मुरकुटे यांना केला.

अ‍ॅड. काळे पुढे बोलत असतानाच यांचा माईक बंद करण्यात आला. त्यांना बोलण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केली, यावेळी दोनवेळा वीज प्रवाहही खंडित करण्यात आला. अनेक कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाऊन श्री. काळे यांना बोलण्यास मज्जाव केल्याने निषेध व्यक्त केला. अखेर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह अजित काळे व मोठ्या प्रमाणावर सभासदांनीही सभागृह सोडत सभागृहाच्या बाहेर निषेध सभा घेत निषेध व्यक्त केला. यावेळी सभासदांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप श्री. काळे व प्रताप भोसले यांनी केला. या सभेसाठी पोलीस निरिक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ससाणे, गुजर यांची सभेकडे पाठ : भोसले
जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे व सचिन गुजर यांनी अशोक कारखाना निवडणुकीमध्ये भानुदास मुरकुटे यांच्यासाठी मतांचा जोगवा मागितला, आता सभासद त्यांना जाब विचारतील म्हणून ससाणे व गुजर यांनी सभेकडे पाठ फिरवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.

युवा नेत्याकडून अपशब्द
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांना बोलण्यास मज्जाव केल्यानंतर सर्वच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले, त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेतली, त्यावेळी उपस्थित असलेल्या युवा नेता व शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली.

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...