Wednesday, September 16, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ०९ एप्रिल २०२६ - अर्धविरामही नसे थोडका!

संपादकीय : ०९ एप्रिल २०२६ – अर्धविरामही नसे थोडका!

अमेरिका-इस्त्रायल व इराण यांच्यात दीड महिनाभर चाललेल्या युद्धात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाल्याने भविष्यात आणखी काय वाढून ठेवले आहे, या विचाराने भयग्रस्त झालेल्या जगाने काही काळापुरता का होईना सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. अमेरिकेच्या वल्गना, इस्त्रायलची अडेलतट्टू भूमिका आणि आक्रमणाने दुखावल्या गेलेल्या इराणने शेवटपर्यंत लढण्याचा घेतलेला पवित्रा यामुळे युद्धबंदीची शक्यता लांबत चालली होती. ज्यांच्या अपरिपक्वतेचा फटका या संघर्षाशी आणि इराण, अमेरिका-इस्त्रायल यांच्या वादाशी दुरान्वयाने संबंध नसलेल्या जगातील अब्जावधी नागरिकांना बसला, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिवसाला चार वेगवेगळी विधाने करत असल्याने एका प्रचंड अस्थिरतेच्या टोकावर संपूर्ण दुनिया जाऊन बसलेली होती.

- Advertisement -

जगाच्या इतिहासात प्राचीन काळापासून आतापर्यंत हजारो लढाया झाल्या असतील. त्या होेण्यामागे काहीतरी कार्यकारण भाव, उद्दिष्टे होती आणि त्याचे काही फलितही मिळालेले होते. दुर्दैवाने, अर्वाचीन जगातील सर्वात ताजा मोठा संघर्ष कोणा एका देशाला धडा शिकवण्यासाठी उभा करण्यात आला आणि तोही ट्रम्प व इस्त्रायलचे मतलबी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या अहंकार शमनासाठी. हल्ल्यामागचे जे उद्दिष्ट ट्रम्प महाशय सांगत होते, ती कथित अण्वस्त्रे आणि युरेनियमचा साठा ना त्यांच्या हाती लागला ना तो त्यांनी नष्ट केल्याचे काही पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे ४५ दिवस संंपूर्ण जग वेठीस धरले गेले आणि आखाती देशांमधील नागरी जीवन कमालीचे विस्कळीत होऊन त्यांना व्यावसायिक व आर्थिकद़ृष्ट्या मोठा फटका बसला हेच काय ते यामागचे फलित मानावे लागेल. थोडाफार काही फायदा झाला असेल तो इस्त्रायलचा.

अमेरिकेच्या मदतीने या देशाने त्यांचे काही मुस्लीम राष्ट्रांविरुद्धचे जुने हिशेब चुकते करून घेतले. हक्काची जमीन नसलेल्या इस्त्रायलला त्या कारणावरून आतापर्यंत भरपूर सहानुभूती मिळाली आहे; मात्र त्या देशाला अन्य राष्ट्रांविषयी काही देणेघेणे नाही, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. भारतात इस्त्रायलचे बरेच चाहते आहेत. विद्यमान संघर्षातही त्यांचा कल याच देशाच्या बाजूने होता. इराणला धडा शिकवला जायला हवा, असेही तारे समाज माध्यमांवरचे व्यासंगी वीर तोडत होते. ते एक मुस्लीम राष्ट्र असल्याचा विचार यामागे असल्याचे स्पष्टच होते. धार्मिक धु्रवीकरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या सर्वस्वी वेगळ्या बाबी असतात एवढी पोच या मंडळींची असणे शक्यच नाही. कोणत्याही घटनेकडे वा घडामोडींकडे एकच एक चष्म्यातून पाहणारा संप्रदाय सांप्रत काळी वाढत चालला आहे. त्याचेच हे अनुयायी. त्यांनी समाज माध्यमांवर ही भूमिका घेतलेली असताना, त्यांच्या द़ृष्टीने देशातल्या सर्वात शक्तिशाली व यशस्वी राजवटीने मात्र कोणतीही भूमिका घेतली नाही.

जगातील यच्चयावत प्रगत देशांचे प्रमुख आपल्या राजवट प्रमुखाचे खास दोस्त असल्याचा करण्यात आलेला प्रपोगंडा समाज माध्यमांवर आपले प्रभुत्व निर्माण करण्यासाठी ठोकून दिलेली लोणकढी थाप असल्याचे सिद्ध झाले. भारताने नको तेवढी तटस्थता दाखवली. अलिप्ततावाद देशाला लाभदायी ठरत आला आहे; पण इराण या जुन्या मित्रराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्यात आल्याचा साधा निषेधही न करण्याइतपत समतोल आजतागायत कधीही साधला गेला नसेल. इराणने मात्र त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या यादीत भारताचे नाव कायम ठेवून होर्मुझची सामुद्रधुनी आपल्या जहाजांना खुली करून दिली. यात आपल्या परराष्ट्र धोरणाचा काहीही वाटा नसताना नेहमीप्रमाणे ‘मुमकिन है’सारखा पाठ थोपटून घेण्याचा प्रकार झालाच. वास्तवात, भारत आणि इराण यांच्यात पूर्वापार घनिष्ठ असे ऐतिहासिक आणि व्यापारी संबंध आहेत. कच्च्या तेलासह शेतीमाल, औषधे या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांत देवाणघेवाण होत आली आहे. इराणमधील चाबहार हे बंदर विकसित करण्यात भारताचे मोठे तांत्रिक योगदान आहे.

विशेष म्हणजे, अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादल्यावरही उभय देशांनी ते जतन केले आहेत. असो, पश्चिम आशियातील संघर्ष आता थांबला असल्याने गुंतवणूकदारांना पंधरवडाभर तरी शांत झोप लागेल. मधल्या काळात कच्चे तेल महागल्याने व त्याची काहीअंशी टंचाईदेखील निर्माण झाल्याने महागाई वाढली आहे. सर्व प्रकारच्या वस्तूंचे भाव पूर्ववत होण्यास काही काळ जावा लागणार असला तरी हळूहळू ते नियंत्रणात आणले तरच सामान्यांना या शस्त्रसंधीचा काही थेट लाभ होईल. तसेच जगाच्या मानगुटावर बसलेल्या उपद्रवी शक्तींनी पंधरवड्याच्या कालखंडानंतर पुन्हा उचल खाऊ नये, अशी प्रार्थनाही विश्वन्नियंत्याकडे करावी लागेल.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात मेट्रोची गरज – आ. संग्राम जगताप

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भविष्यात अहिल्यानगर शहरातील वाढत्या वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर शहरात मेट्रो ट्रेनची अत्यंत गरज आहे. आतापासूनच या दृष्टीने योग्य नियोजन...