राहाता | Rahata
बुधवारी विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर राज्यातील सर्वच उमेदवार व कार्यकर्त्यांचे शनिवारी होणार्या मतमोजणीकडे लक्ष लागल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली असून कोणता उमेदवार विजयी होणार, कोणाला किती मताधिक्य मिळणार, राज्यात कुणाचे सरकार येणार, कोणाचा पराभव होणार याची चर्चा ग्रामीण बरोबर शहरी भागात रंगल्याचे दिसत असून उद्या 23 नोव्हेंबर रोजी होणार्या मतमोजणीकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण राज्यात विधानसभेच्या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले होते. निवडणुकीच्या आखाड्यात आपला प्रतिस्पर्धी असलेला उमेदवार आपल्यापेक्षा कसा कमकुवत आहे व आपण त्यापेक्षा राजकीयदृष्ट्या कसे ताकतवर आहेत हे दाखवून देण्यासाठी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांनी प्रचार दरम्यान एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत वातावरण चांगलेच तापून टाकल्याचे बघायला मिळाले. निवडणुकीदरम्यान पंधरा दिवस देशातील सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सभा घेऊन मतदारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी खेचण्यासाठी मजुरी करणार्या व्यक्तींना या निवडणुकीत चांगलाच डिमांड आल्याचे दिसून आले. परिणामी शेती व इतर ठिकाणी मजुरीसाठी मनुष्यबळ मिळत नसल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचार करण्यासाठी अवघे पंधरा दिवस मिळाल्याने उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी दमछाक करावी लागली. त्यामुळे कधी एकदाची 20 नोव्हेंबर तारीख येईल व निवडणूक पार पडेल असे उमेदवारांच्या चेहर्यावर दिसत होते. निवडणुकी दरम्यान प्रत्येक गावात शाकाहार व मांसाहार असणार्या हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी बघायला मिळाली.
अखेर बुधवारी महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त पद्धतीने मतदान करत आपला मतदान हक्क बजावला. निवडणुकीची धामधूम 20 नोव्हेंबर रोजी संपली मात्र उमेदवार व कार्यकर्त्यांचे लक्ष आता शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी होणार्या मतमोजणीकडे लागले आहे. या निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी अनेक उमेदवारांनी देवाकडे साकडे घालायला सुरुवात केली आहे. अनेक उमेदवार देव दर्शनासाठी जाताना दिसत आहे. बुधवारी निवडणूक संपल्यानंतर गुरुवारी सकाळी कोणता उमेदवार निवडून येईल निवडून येणार्या उमेदवाराला किती मताधिक्य असेल कोणाला पराभवाचा सामना करावा लागेल, राज्यात कोणाचे सरकार येईल, कोणत्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत काम केले व केले नाही याची चर्चा आता सर्वत्र सुरु होती. कोणता उमेदवार निवडून येईल व कोणाला पराभवाचा सामना करावा लागेल यासाठी कार्यकर्ते आपापसात पैंज लावताना दिसून आहे. संपूर्ण राज्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात गुरुवारी सकाळपासूनच नागरिकांमध्ये 23 तारखेच्या मतमोजणीकडे लक्ष लागले असून उमेदवार व कार्यकर्त्यांची देखील मतमोजणीच्या निकालाकडे लक्ष लागल्याने धाकधूक वाढल्याचे बघायला मिळाले.