अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून उद्या शनिवारी जिल्ह्यातील 12 मतदारसंघांची मतमोजणी होणार आहे. साधारण एका मतदारसंघासाठी 100 ते 150 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून या सर्वांना आज (शुक्रवारी) मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात मतदान केंद्राच्या संख्येनूसार मतदानाच्या फेर्या ठरणार असून प्रत्येक ठिकाणी मोजणीसाठी 14 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एकावेळी 14 टेबलची मोजणी पूर्ण झाल्यावर मोजणीचा एक राऊंड होणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक मतमोजणीच्या फेर्या या शेवगाव आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी 26 अशा होणार आहेत. तर श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड प्रत्येकी 25 फेर्या होणार असून राहुरी, श्रीरामपूर आणि अकोले मतदारसंघात प्रत्येकी 22 फेर्या होणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मतमोजणीसाठी वेळ या चार मतदारसंघांत लागणार आहे. उर्वरितमध्ये नगर शहरात 21 फेर्या, संगमनेर 21 फेर्या, नेवासा 20 फेर्या तर शिर्डी आणि कोपरगाव मतदारसंघात प्रत्येकी 19 फेर्या होणार आहेत.
जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रात मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 डेबल लावण्यात येणार आहेत. यासह सैनिक व पोस्टल मतांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल असणार आहेत.
प्रत्येक ठिकाणच्या मतमोजणीसाठी 100 ते 150 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कर्मचार्यांना आज मोजणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू करण्यात येणार असून साधारणपणे दहाव्या फेरीपासून निकालाचा प्राथमिक कल हाती येणार आहे.
मतमोजणी केंद्राचे ठिकाण
मतदारसंघ – मतमोजणी
अकोले- तहसील कार्यालय नवीन इमारत
संगमनेर – भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल
शिर्डी – प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राहाता
कोपरगाव – सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल
श्रीरामपूर – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय
नेवासा – न्यू गव्हर्न्मेंट ग्रेन गोडाऊन, मुकुंदपुरा, नेवासा फाटा
शेवगाव – शासकीय इमारत तहसील कार्यालय शेवगाव
राहुरी – रामदास पाटील धुमाळ न्यू आर्टस कॉलेज, राहुरी
पारनेर – औद्यागिक प्रशिक्षण संस्था, पारनेर
अहमदनगर शहर – वेअर हाऊस गोडाऊन एमआयडीसी, नागापूर
श्रीगोंदा – गव्हर्न्मेंट ग्रेन गोडाऊन, पेडगाव रोड
कर्जत जामखेड – दादा पाटील महाविद्यालय, कर्जत.
जिल्ह्यात 72. 47 टक्के मतदान
नगर 63.85, अकोले 71. 98, कर्जत-जामखेड 75. 97, कोपरगाव 71. 31 , नेवासा 79.94, पारनेर 70. 19, संगमनेर 75.19, शेवगाव- पाथर्डी 69. 36, शिर्डी 75.81, श्रीगोंदा 73. 85, श्रीरामपूर 70. 24, राहुरी 74. 52 असे आहे.
अशी होते मतमोजणी
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. यावेळी प्रत्येक पक्षाचे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता स्ट्राँग रूमचे कुलूप उघडले जाते. यावेळी निवडणूक आयोगाचे निवडणूक अधिकारी आणि विशेष निरीक्षकही उपस्थित असतात. या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ शूट केला जातो. त्यानंतर इव्हीएमचे कंट्रोल युनिट मतमोजणी टेबलावर आणले जाते. या प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाते. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जाते. टेबलावर ठेवल्यानंतर प्रत्येक कंट्रोल युनिटचा युनिक आयडी आणि सील जुळतात. प्रत्येक उमेदवाराच्या पोलिंग एजंटलाही ते दाखविले जाते. त्यानंतर कंट्रोल युनिटमधील बटण दाबल्यानंतर प्रत्येक उमेदवाराचे मत त्याच्या नावापुढे इव्हीएममध्ये दिसू लागते.