अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या ‘मिशन- 75’ या संकल्पनेतून येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करणार्या गाव, शहर, उद्योग, कंपन्या, महाविद्यालयाचे युवा मतदार तसेच हाउसिंग सोसायटी यांच्यासाठी ‘लोकशाहीचे शिल्पकार’ पुरस्कार जिल्हाधिकारी कार्यालयाचे वतीने प्रदान केले जाणार आहेत.
भारताने नुकताच स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा अमृत महोत्सव साजरा केला. अहिल्यानगर जिल्ह्याचा व भारतीय स्वातंत्र्याचा अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे हे औचित्य साधून जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या संकल्पनेतून 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान करणार्या गावांचा ‘लोकशाहीचे शिल्पकार’ हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. उद्योजकीय क्षेत्रामधील कंपन्यांच्या मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने त्यांना ‘सुपर वोटर अवॉर्ड’ दिला जाणार आहे.
युवा नवमतदारांच्या मतदानासाठी महाविद्यालयांना युवाभारती पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. हाऊसिंग सोसायट्यांना मतदानासाठी ‘लोकशाहीचे शिल्पकार’ हा मानाचा सन्मान प्रदान केला जाणार आहे. जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण मतदार जनजागृतीचे उपक्रम जिल्ह्यामध्ये चालू आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, सावलीसाठी मंडप व्यवस्था, वृध्दांना मदतीसाठी स्वयंसेवक, मतदार मदत कक्ष, दिव्यांगांसाठी रॅम्प, शौचालय आवश्यक तेथे आदी सेवा पुरवण्याचे नियोजन आहे. यातून सकारात्मकता वाढीस लागून मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढणार आहे.
जास्तीत जास्त गावे, शहर, आस्थापने, कंपन्या, महाविद्यालये तसेच विविध संस्था, कामगार संघटना यांनी मतदानामध्ये शंभर टक्के सक्रिय सहभाग घेऊन ‘मिशन- 75’ ही लोकशाहीच्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची संकल्पना यशस्वी करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे व आकाश दरेकर, विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, नायब तहसीलदार (निवडणूक) प्रशांत गोसावी, जिल्हा मतदार दूत डॉ. अमोल बागुल व सर्व स्वीप समिती सदस्य आदींनी केले आहे.
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून विविध उद्योजकीय कंपन्या, महाविद्यालये, तसेच हाउसिंग सोसायटी यांचे प्रतिनिधींनी आपापल्या आस्थापनातील एकूण मतदार व 20 नोव्हेंबर रोजी मतदान केलेले मतदार व 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले आहे, असा अहवाल जिल्हा निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे 25 नोव्हेंबर पर्यंत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणुकांच्या उत्सवात प्रत्येकाने हिरीरीने सहभागी व्हावे व स्वतःला व समाजाला अभिमान वाटेल असे मतदान करून जिल्हा राज्यात, देशात अग्रेसर बनवायचा आहे.
सिध्दाराम सालीमठ, जिल्हाधिकारी, अहिल्यानगर.