अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 75 टक्के मतदान होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून सर्वाधिक मतदान होणार्या गावाचा आणि मतदारसंघाचा लोकशाही चषक देवून सन्मान केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी गेल्या लोकसभा निवडणुकीत 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावरील मतदान वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. प्रभात फेरीच्या माध्यमातूनही मतदारांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचत आहे.
गावपातळीवर मतदान वाढविण्यासाठी होणार्या या प्रयत्नांना प्रोत्साहीत करण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी चांगले काम करणार्या गावांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील, कृषी सेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती आदींनी मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानाचे आवाहन करावे. मतदारांना मतदान करणे सुलभ होईल अशी व्यवस्था मतदान केंद्रावर करावी. मतदारांच्या स्वागतासाठी विशेष कल्पना राबवाव्यात, असे आवाहनही सालीमठ यांनी केले आहे. शहरी भागातील मतदारांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करण्याचे आवाहन करण्यात यावे. यासाठी विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकार्यांचे सहकार्य घ्यावे. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती द्यावी.
मतदान केंद्रावर आनंददायी वातावरण राहील आणि मतदारांना अधिक वेळ रांगेत उभे रहावे लागणार नाही यासाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात. अशा विविध उपाययोजनांच्या माध्यमातून मतदारांना प्रोत्साहीत करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत. गावपातळीवर आणि मतदारसंघ स्तरावर विविध यंत्रणा, अधिकारी-कर्मचारी निवडणुकीसाठी परिश्रम घेत आहेत. मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यावर विशेष भर देण्यात आला आहे. या संदर्भात स्थानिक स्तरावर काही चांगले उपक्रम राबवून मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करणार्यांचे कौतुक व्हावे, त्यांना अधिक चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमाचा हेतू आहे. शिवाय हा सन्मान हा त्या गावाचा आणि मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा असणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी सांगितले.