Thursday, May 9, 2024
Homeधुळेकोविड रुग्णालयाशी संलग्न विक्रेत्यांनीच रेमडीसीवीर इंजेक्शनची विक्री करावी

कोविड रुग्णालयाशी संलग्न विक्रेत्यांनीच रेमडीसीवीर इंजेक्शनची विक्री करावी

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर औषधोपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिव्हर या औषधाच्या सुरळीत विक्री व वितरणासाठी सर्व घाऊक औषधे विक्रेत्यांनी रेमडेसिव्हर इंजेक्शनची विक्री ही कोविड रुग्णालयाशी संलग्न अशा औषध विक्रेत्यांनाच करावी.

- Advertisement -

किरकोळ औषधे विक्रेत्यांनी आपले दुकान कोविड रुग्णालयाशी संलग्न नसेल, तर रेमडेसिव्हर या इंजेक्शनची खरेदी – विक्री करू नये, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त महेश देशपांडे यांनी दिले आहेत.

केंद सरकारने रेमडेसिव्हर इंजेक्शन या औषधास मान्यता दिली आहे. कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढलेली आहे. या औषधाचा उत्पादकाकडून पुरवठा होण्यावर मर्यादा आहेत.

या औषधाचा वापर नियंत्रित स्वरूपात करण्यासाठी ते केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शन विक्री करावी. या औषधाचा रुग्णालये व संस्थात्मक वापरासाठी पुरवठा करावा, असे केंद्र सरकारने 2 जुलै 2020 रोजीचे स्पष्ट निर्देश आहेत.

रेमडेसिव्हर या औषधाची मागणी करतांना रुग्णाचा चाचणी अहवाल, डॉक्टराचे प्रीस्क्रिप्शन व रुग्णाचे आधार कार्ड इत्यादी जोडण्याच्या सूचना उत्पादकाने रुग्णालये व औषधे विक्रेत्यांना दिलेल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हर या औषधाच्या सुरळीत विक्री आणि वितरणासाठी सर्व घाऊक औषधे विक्रेत्यांनी रेमडेसिव्हर इंजेक्शनची विक्री ही जेथे कोविड रुग्णालयाशी संलग्न असे औषधे विक्रीचे दुकान आहे तेथेच विक्री करावी.

तसेच सर्व किरकोळ औषधे विक्रेत्यांनी आपले दुकान हे कोविड रुग्णालयाशी संलग्न नसल्यास रेमडेसिव्हर इंजेक्शनची खरेदी व विक्री करू नये. यामुळे रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या विक्रीवर योग्य नियंत्रण ठेवणे शक्य होईल.

याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या रेमडेसिव्हर इंजेक्शनची अधिकतम किंमत व खरेदी किंमत यांच्यामध्ये तफावत आहे.

हे औषध करोना विषाणूच्या आजारावरील रुग्णांना आवश्यक असल्याने रुग्णांना औषध विक्री करताना अधिकतम किंमत न आकारता आपली खरेदीची किंमत + 10 टक्के एवढी रक्कम आकारून त्याची विक्री करावी.

करोना विषाणूबाधित रुग्णांना त्याचा लाभ होईल. विक्रेत्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. देशपांडे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या