अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
निंबळक (ता. नगर) शिवारातील व्यावसायिक कुटुंबावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात व्यावसायिक राजू कोतकर यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, रविवारी (2 मार्च) सायंकाळी ही घटना घडली.
दरम्यान, हल्ला करणार्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. इतर संशयित आरोपी पसार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली. निंबळक शिवारात राजू कोतकर यांचे किराणा दुकान आहे. त्या दुकानासमोर रविवारी सायंकाळी वाद झाले. या वादाचे कारण समजू शकले नाही. मात्र या वादातून गुन्हेगारी प्रवृत्तीचा संतोष धोत्रे व त्याच्या साथीदारांनी राजू कोतकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात राजू कोतकर यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी नगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहायक निरीक्षक चौधरी यांनी सांगितले. हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, हल्ला करणारा संशयित संतोष धोत्रे व त्याच्या साथीदारांना तातडीने अटक करावी यासाठी स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू केला आहे.