Monday, May 6, 2024
Homeजळगावजामनेरात विद्यार्थीनीच्या अपहरणाचा प्रयत्न

जामनेरात विद्यार्थीनीच्या अपहरणाचा प्रयत्न

जामनेर । Jamner

जामनेर शहरात बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास चार-पाच अज्ञात महिलांनी जामनेर पुरा भागातील नामांकित इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाच्या गेटवर पाचवीत जाणार्‍या चिमुकलीला पळवून नेण्यासाठी तिच्या नाकाला रुमाल लावून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मुलीने सदर महिलेच्या हाताला चावा घेऊन शाळेत पळत जात शिक्षकांकडे घटना कथन केली, यादरम्यान अज्ञात महिला पसार होण्यात यशस्वी ठरल्या. मात्र या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शाळेच्या मुख्याध्यापकांनी मात्र या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल का केला नाही? याचबरोबर या घटनेचे वृत्त त्या मुलींच्या पालकांना का सांगितले नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

शहरातील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालय ही नामांकित शिक्षण संस्था असून संपूर्ण जिल्हाभरातून या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शाळेची शिस्त अतिशय कडक असून दोन शिफ्ट मध्ये ही शाळा भरते. सकाळचे वर्ग सुरू असताना शाळा प्रशासन बाहेर पटांगणात एकाही विद्यार्थ्याला फिरू देत नाही.तरी देखील शाळेच्या गेटवर ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. सकाळी साडेदहा वाजता शास्त्रीनगर मधील विद्यार्थिनी रोशनी गणेश चौधरी शाळेत जात असताना एक नंबरच्या गेटवर आली असता काही अज्ञात महिला त्या मुली जवळ गेल्या, तिच्याशी चर्चा केली व गुंगीचे औषध टाकलेला रुमाल तिच्या नाकाला लावून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

मात्र सदर मुलीने चतुराईने त्या महिलेच्या हाताला चावा घेऊन पळ काढला व क्लास मध्ये जाऊन सदर घटना आपल्या वर्ग शिक्षकाकडे कथन केली .वर्ग शिक्षकांनी गेट जवळ जाऊन बघितले असता तेथून सदर महिला पसार झाल्याचे लक्षात आले. परिसरात प्रत्यक्षदर्शी नसले तरी गाऊन मध्ये व साडी मध्ये असलेल्या महिला या किन्नर होते असे काहींचे म्हणणे आहे. याच शाळेतील गेट नंबर दोन जवळ दोन चिमुकल्या मुलींना पळवून नेण्याचा डाव त्यांनी आखला होता. सदर मुलींनाही त्या बोलवित होत्या. मात्र त्या मुलींनी तेथून पळ काढला.

ही घटना एवढी गंभीर असताना शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसात या संदर्भात कुठलीही तक्रार दिली नाही. याबाबत मुख्याध्यापकांनी साधा अर्ज दिल्याचे वृत्त आहे. प्रशासनाने मुलीच्या वडिलांना सुद्धा या घटनेची माहिती दिली नाही. अशी खंत मुलीचे वडील गणेश चौधरी यांनी बोलून दाखवली.

पालक शाळा प्रशासनाच्या भरवशावर आपल्या चिमुकल्यांना शाळेत पाठवतात. त्यांच्या संरक्षणाची व रक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही शाळा प्रशासनाची असते .असे असताना शाळा प्रशासन मात्र मनमानी पद्धतीने फी घेण्यात मश्गुल असून प्रशासनाने कुठलेही सुरक्षारक्षक आतापर्यंत नेमल्याचे दिसत नाही. शाळेच्या आवारात व संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाने कोणतेच पाऊल उचलल्याचे दिसत नाही. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त केली असून या घटनेमुळे पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या