दिल्ली । Delhi
लहान मुलांमध्ये सोशल मीडियाचे वाढते व्यसन आणि त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन ऑस्ट्रेलिया सरकारने एक धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता १६ वर्षांखालील मुलांना देशातील प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. बालकांचे ऑनलाईन धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी उचललेले हे जागतिक स्तरावरील पहिले मोठे पाऊल आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने लागू केलेला हा नवा कायदा ‘फेसबुक’, ‘इंस्टाग्राम’, ‘टिकटॉक’, ‘स्नॅपचॅट’, ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर), ‘युट्यूब’, ‘रेडिट’ आणि ‘किक’ यांसारख्या १० हून अधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लागू झाला आहे. या निर्णयामुळे आता १६ वर्षांखालील मुलांना यापैकी कोणत्याही ट्रेंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी या कायद्याचे जोरदार समर्थन केले आहे. डिजिटल युगात मुलांचे मानसिक आरोग्य आणि त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. सोशल मीडियामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ नये, हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकारने सांगितले की, लहान मुले या ऑनलाईन जगात पूर्णपणे सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. काही सोशल मीडिया कंपन्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असली, तरी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने लागू केलेला हा कायदा जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.
कारण एवढ्या मोठ्या स्तरावर सोशल मीडियावर बंदी घालण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. या निर्णयामुळे सोशल मीडिया कंपन्यांसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. या सर्व प्लॅटफॉर्म्सना नवीन नियमांचे पालन करण्यासाठी आणि वयोमर्यादा पडताळण्यासाठी त्यांच्या वेबसाईटच्या लॉग-इन प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत.
या नवीन कायद्यानुसार, सोशल मीडिया कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील १६ वर्षांखालील सध्याचे युजर्स अकाउंट्स बंद करावी लागतील. तसेच, या वयोगटातील मुलांना नवीन अकाउंट तयार करण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने स्पष्ट केले आहे की, लागू केलेल्या या कायद्याचे पालन न करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कठोर दंड भरावा लागेल. हा दंड तब्बल ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर इतका असू शकतो, ज्याचे भारतीय रुपयांमध्ये मूल्य २७० कोटींहून अधिक आहे. कठोर दंडाची तरतूद केल्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांना या नियमांचे पालन करणे बंधनकारक झाले आहे.




