Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यारामजन्मभूमी उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक; गर्लफ्रेंडच्या भावाला अडकवण्याच्या उद्देशाने....

रामजन्मभूमी उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक; गर्लफ्रेंडच्या भावाला अडकवण्याच्या उद्देशाने….

अयोध्या | Ayodhya

राम जन्मभूमी मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या पत्नीसह राहुरी कृषी विद्यापीठाजवळील एका गावातून अटक करण्यात आली आहे. गत २ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ च्या सुमारास राम जन्मभूमी परिसरालगत राहणाऱ्या मनोज कुमार यांना एका व्यक्तीने राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती.

- Advertisement -

अयोध्या पोलिसांना तपासात आढळले की, आपल्या आरोपीने गर्लफ्रेंडच्या भावाला अडकवण्यासाठी त्याच्या मोबाईल नंबरवरून नेट कॉलिंग करून राम मंदिर उडवण्याची धमकी दिली होती. अयोध्येचे सर्कल ऑफिसर एस. के गौतम यांनी सांगितले की, मनोज कुमार यांच्याकडे ज्या क्रमांकावरून फोन आला त्याची सर्व्हिलांसच्या मदतीने चौकशी करण्यात आली.

त्यात अनिल रामदास घोडके उर्फ बाबा जान मूसा नामक व्यक्तीने दिल्लीच्या बिलालला फसवण्याच्या हेतूने नेट कॉलिंग करून त्याच्या नावाने धमकी दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने अनिल रामदास घोडके व त्याची पत्नी जार्ड संतन शाणी एश्वेरा उर्फ आयरन सॅटर्न हेल यांना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भागातून अटक करण्यात आली. पकडण्यात आलेले आरोपी सातत्याने पोलिसांची दिशाभूल करत होते. स्वतःला कधी चेन्नई तर कधी महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याची बतावणी करत होते.

मधुबन सिंह यांनी सांगितले की, मनोज कुमार यांच्या फोनवर पहाटे ५ च्या सुमारास एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. मनोज यांनी त्यांना तुम्ही कोण व कुठून बोलत आहात ? असे विचारले असता त्यांनी आपण दिल्लीहून बोलत असल्याचे सांगितले. आज सकाळी १० वाजेपर्यंत राम जन्मभूमी उडवण्यात येईल अशी धमकीही त्याने दिली होती.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ९ मोबाइल फोन, लॅपटॉप, २ कुराण, मुस्लीम टोप्या, आधार कार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड, चेक बूक, बर्थ सर्टिफिकेट, इलेक्शन कमिशनचे २ साधे फॉर्म, सुधारित आधार कार्ड, ताबीज मालासह अनेक आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली आहे. सीओ गौतम यांच्या माहितीनुसार, अनिल रामदास घोडके याने यापूर्वीही अशा प्रकारचे बेकायदा कृत्य केले होते. त्याने रामजन्मभूमीसह दिल्ली मेट्रो स्टेशनही बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती.

स्थानिक पोलीस अनभिज्ञ

राहुरी कृषी विद्यापिठाजवळील डिग्रस येथे या जोडप्यास अटक केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला, पण ते याबाबत अनभिज्ञ होते. त्यानंतर राहुरी पोलीस या गावात जाऊन या जोडप्याबाबत माहिती घेत होते. या गावातील काही प्रमुख मंडळींशी संपर्क साधला असता तुमच्याकडूनच हे कळते आहे. अशी व्यक्ती गावात नसल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या