राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी हे पद सोडल्याचे सांगितले जात असले तरी, या फेरबदलांना नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मेळाव्यात खासदार प्रफुल पटेल यांनी केलेल्या टीकेची किनार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बाबासाहेब पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता मंत्री इंद्रनील नाईक यांच्यावर गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी येथे झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत याबाबतची घोषणा केली. अजित पवार यांच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, इंद्रनील नाईक हे विदर्भातील मंत्री असल्याने त्यांना गोंदियाला वारंवार भेटी देणे आणि तेथील कामे पाहणे सोयीस्कर ठरू शकते. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी गोंदियाच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी यासाठी प्रकृतीचे कारण पुढे केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले आहे. पायाच्या सातत्याने येणाऱ्या समस्यांमुळे लांबचा प्रवास करणे त्यांना शक्य होत नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. सामान्यतः पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये चढाओढ असते, अशा परिस्थितीत बाबासाहेब पाटील यांनी स्वतःहून पद सोडणे ही बाब लक्षणीय ठरली आहे.
बाबासाहेब पाटील यांच्या राजीनाम्याला राजकीय टीकेची किनार असल्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भव्य मेळाव्यात खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली होती. पटेल म्हणाले होते की, “विदर्भातील पालकमंत्री केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच जिल्ह्यात येतात. इतर वेळी ते जिल्ह्याला वेळ देत नाहीत आणि तेथील पदाधिकारी व नेत्यांना सोबत घेत नाहीत.” ही टीका थेट विदर्भातील जिल्ह्यांचे पालकमंत्री असलेल्या नेत्यांवर होती. त्यामुळे पटेल यांच्या टीकेनंतर लगेचच हा फेरबदल झाल्याने, राजकीय अर्थ काढले जात आहेत.
यापूर्वी पालकमंत्रीपदांची चाचपणी सुरू असताना, बाबासाहेब पाटील यांनी स्वतःच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मागितले होते. मात्र, त्यांची ही मागणी पूर्ण झाली नव्हती. विशेष म्हणजे, हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील या दोघांनाही त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांची सुरुवातीपासूनच नाराजी होती. यापूर्वी हसन मुश्रीफ यांनीही विदर्भातील एका जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडले होते आणि आता बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडले आहे. यामुळे मंत्रिमंडळातील या नेत्यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
आता नवीन पालकमंत्री झालेले इंद्रनील नाईक हे स्वतः विदर्भातील मंत्री आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने हा बदल सोयीस्कर ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गोंदियातील विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा आहे.




