मुंबई । Mumbai
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांच्या अडचणी, आंदोलनाची दिशा आणि सरकारच्या धोरणांवरील नाराजीवर सविस्तर चर्चा झाली. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा हा कोणत्याही पक्षाचा किंवा जाती-धर्माचा नसून सर्वसमावेशक असल्याचे त्यांनी सांगितले.
“मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथून शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठला पाहिजे. राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे,” असे कडू म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि सरकारचे त्याकडे दुर्लक्ष यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “रोज 10-15 शेतकरी आत्महत्या करत आहेत. युद्धात जितके मृत्यू होत नाहीत, तितके सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना दुष्काळाची वाट पाहण्याची गरज नाही, असे सांगत कडू यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणांवर टीका केली. “दुष्काळापेक्षा जास्त नुकसान पिकांना योग्य भाव न मिळाल्याने होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पिकांचे दर घसरत आहेत, याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी लवकरच एक यात्रा आयोजित करण्यात येणार असून, या आंदोलनात राज ठाकरे यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कडू यांनी केले.
या भेटीत शेतकरी आंदोलनाला कोणत्याही राजकीय किंवा जात-धर्माच्या चौकटीत न बांधण्याचा मुद्दा पुढे आला. “शेतकरी, मेंढपाळ, मच्छिमार यांच्यासाठी न्याय मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकरी एकत्र येत नाहीत, ही खंत आहे. शरद जोशींसारख्या नेत्याला शेतकऱ्यांनीच पाडले, हे दुर्दैवी आहे,” असे कडू म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचा शेतकरी प्रश्नावरील अभ्यास दिसून आल्याचे सांगितले.
येत्या 9 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला सरकारला ‘वेदनेची राखी’ बांधणार आहेत. “शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी बाधित कुटुंबातील महिला या उपक्रमात सहभागी होतील,” अशी माहिती कडू यांनी दिली. यापूर्वी अमरावतीत कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पदयात्रा काढली होती, ज्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला होता. तसेच, चक्का जाम आंदोलनालाही मनसेने पाठिंबा दिला होता.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, ही बैठक अर्धा तास चालली आणि येणाऱ्या काळात मराठवाड्यात परभणीपासून शेतकरी आंदोलनाची सुरुवात होणार आहे. “राज ठाकरे यांना या आंदोलनाचे निमंत्रण देण्यात आले असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,” असे नांदगावकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढण्याची गरज असल्याचे सांगत बच्चू कडू यांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांचा लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.




