अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अधिकार्यांच्या पगाराला, महामार्ग बांधायला शासनाकडे पैसे आहेत. परंतू, शेतकर्यांच्या कर्जमाफीचा विषय आला की पैसे नसल्याचे कारण दिले जाते. लाडक्या बहिणीकडे बोट दाखवले जाते. सरकारने कर्जमाफीवरुन बनवाबनवी थांबवून शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा करावा. अन्यथा 28 ऑक्टोबरपासून राज्यात चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा माजी मंत्री, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे.
अहिल्यानगर येथे सोमवारी दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते माध्यमांशी बोलत होेते. यावेळी बच्च कडू म्हणाले, पंजाबमधील शेतकर्यांना केंद्र व राज्यांनी मिळून प्रतिहेक्टरी 50 हजार रुपये दिले आहेत. त्याप्रमाणे आपल्या शेतकर्यांना देखील देण्यात यावेत. परंतु यांची मानसिकता दिसत नाही. शासनाने 27 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. कारखान्याला ऊस घालून वर्ष झाले तरी शेतकर्यांना पैसे मिळत नाही. राज्यात एक कारखाना धड राहिला नाही. एका बाजुला शेतकर्यांची मते घ्यायचे, दुसर्या बाजूला त्यांना लुटायचे, अशी कारखानदारांची भूमिका आहे.
उशीरा पैसे देणार्या कारखान्यांनी 15 टक्के व्याजाने पैसे द्यावेत. अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. राज्य सरकारला ओला दुष्काळ जाहीर करता येत नसेल तर नैसर्गिक आपत्तीसाठी केंद्र व राज्य सरकारचा वेगळा निधी असतो. त्यातून शेतकर्यांना मदत करावी. पुराच्या पाण्यात जमिनी खरडून गेलेल्या शेतीचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा, त्यांच्या शेतात टाकून द्यावा, अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली.
अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा
बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्हाला तुकाराम मुंडे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. बोगस प्रमाणपत्र देणारे अधिकारी पैसे खातात. अशा अधिकार्यांचा चौरंगा केला पाहिजे. दिव्यांगाच्या हक्कावर घुसखोरी करणार्यांची चौकशी करुन गुन्हे दाखल केले पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.
शेतकरी हिंदू नाहीत का ?
निवडणुकीवेळी कर्जमाफीची घोषणा करता येते. पण आता का देत नाहीत. सध्या जाती-धर्मात वाद लावण्याचे षडयंत्र आहे. लोक जाती-धर्मात भांडले की सरकारला कोणी प्रश्न विचारत नाही. असे वाद लावण्याचे सर्वच राजकीय पक्षांचे षडयंत्र आहे. निवडणुकीत भाजपचा एक हैं तो सेफ हैं चा नारा होता. आता अतिवृष्टीत नुकसान झालेले शेतकरी हिंदू नाहीत का? त्यांना का मदत केली जात नाही? असा सवाल कडू यांनी केला.




