Friday, May 3, 2024
Homeनगरस्वस्त धान्य प्रकरणी लोकप्रतिनिधी गप्प का?

स्वस्त धान्य प्रकरणी लोकप्रतिनिधी गप्प का?

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील स्वस्त धान्य प्रकरणी आदिवासी गोर गरीब जनतेच्या तोंडातील घास हिरावून नेत असताना इतर प्रश्नी नेहमी तत्परता दाखविणारे तालुक्याचे लोकप्रतिनिधी गप्प का? याबाबत त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सेना नेते बाजीराव दराडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

- Advertisement -

चार दिवसांपूर्वी रेशनिंगच्या बाबतीत राजूर पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी जी कारवाई केली त्यातील मुख्य आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी केली आहे. एकीकडे करोनाच्या काळात सर्वत्र बंदी असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाला आहे. गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सकाळ-संध्याकाळची चूल कशी पेटेल ही चिंता असताना दुसरीकडे दिवसा ढवळ्या रेशानिंगचा काळा बाजार होताना दिसत आहे.

ही बाब अत्यंत खेदजनक आणि निषेधार्थ आहे. गोरगरीब जनतेच्या हक्काच्या धान्यावर अशा पद्धतीने कोणी डल्ला मारत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देऊ. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा या घटनेच्या निषेधार्थ आक्रमक भूमिका हाती घेऊ, असे शिवसेनेचे माजी उपसभापती मेंगाळ यांनी सांगितले.

संबधित ठेकेदार व दोषी अधिकारी यांचेवर कठोर कारवाई करावी- सौ. शेंगाळ

आदिवासी गोरगरीब जनतेच्या तोंडातील घास हिसकावून कुणी घेत असेल तर ते मुळीच सहन केले जाणार नाही. संबधित ठेकेदार व दोषी अधिकारी यांचेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तारामती आदिवासी महिला संघटनेच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी आदिवासी महिला सेलच्या सौ. मीनाक्षी शेंगाळ यांनी तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राजूर येथे पकडण्यात आलेल्या चार ट्रक स्वस्त धान्य प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी म्हणून तहसीलदार यांना तारामती आदिवासी महिला बहुउद्देशीय विकास संस्थेच्या अध्यक्ष मिनाक्षी शेंगाळ यांनी निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलचे अध्यक्ष अशोक माळी, राष्ट्रवादी काँग्रेस आदिवासी सेलचे सरचिटणीस मारुती शेंगाळ व केळी कोतुळ चे युवा नेते सिताराम वायळ यांनी निवेदन दिले होते.

आमदार डॉ. किरण लहामटे यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह

अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या करोना चाचण्या करून घ्याव्यात व काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. आ. डॉ. लहामटे हे राजूर येथे आपल्या निवासस्थानी करोनावर उपचार घेत आहेत. करोनामुळे ते क्वारंटाईन आहेत. स्वस्त धान्य प्रकरणी ज्यांना राजकारण करायचे त्यांना ते करू द्या, माझा करोनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपण याप्रकरणी आपली भूमिका जाहीर करू, असे आ. डॉ. लहामटे यांनी म्हटले असल्याचे त्यांच्या पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टद्वारे आवाहन केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या