Friday, May 3, 2024
Homeनगरबोठेचा आयपॅडही फॉरेन्सिक लॅबकडे पाठविणार

बोठेचा आयपॅडही फॉरेन्सिक लॅबकडे पाठविणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या घर झडतीत पोलिसांनी आयपॅड जप्त केला होता.

- Advertisement -

त्याचेही लॉक उघडत नसल्याने आयपॅडची फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, लवकरच आयपॅड तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

पोलिसांनी बोठेच्या समक्ष त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी एक आयपॅड जप्त केला होता. यापूर्वी पोलिसांनी बोठेचा मोबाईल, पंटर तनपुरेचे सात मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. आता आयपॅडची तपासणी फॉरेन्सिकमार्फत केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी सागर भिंगारदिवे याला दिली होती. ही सुपारी 12 लाखाची असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पैशाचा व्यवहार कशा पद्धतीने झाला याचा सुद्धा तपास अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार्‍या वस्तूचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.

आरोपी बोठे याला तीन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी न्यायालयाने दिले आहेत. या हत्याकांड प्रकरणामध्ये अजून कोणाचा समावेश आहे, याची माहिती आता पोलिसांकडून घेतली जात आहे.

बोठेने घेतली होती डॉ. शेळकेची भेट

हत्याकांड प्रकरणात नाव येताच बोठे पसार झाला. त्याने नगर सोडल्यानंतर तो नाशिक येथे गेला होता. त्याठिकाणी तो शहर सहकारी बँक घोटाळ्यातील आरोपी डॉ. निलेश शेळके याला भेटल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर बोठे याने 3 डिसेंबर 2020 रोजी नाशिक शहर सोडले होते. तो 12 डिसेंबरला हैदराबादमध्ये गेल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मात्र, 3 डिसेंबर ते 12 डिसेंबर या काळावधीत बोठे कुठे गेला? कोणाला भेटला? याचा तपास पोलीस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या