संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे. मात्र संगमनेर मोडण्याचे षडयंत्र काही मंडळी करत आहेत. आश्वी बुद्रुक अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव हा संगमनेरसोबत झालेला विश्वासघात आहे. जर संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, असा सज्जड इशारा काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी भरसभेत तहसीलदारांच्या सहीने जिल्हाधिकार्यांना सादर झालेला अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्तावच जनतेला दाखविला.
नव्याने आश्वी बुद्रुक येथे होणार्या अप्पर तहसील कार्यालयात समाविष्ट होणार्या गावांच्या शिष्टमंडळाने कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री थोरात यांची भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. रणजीतसिंह देशमुख, आर. बी. रहाणे, लक्ष्मण कुटे यांच्यासह विविध गावांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महसूल प्रशासन हे जनतेच्या सोयीसाठी असते. अप्पर तहसील निर्मितीला आमचा विरोध नाही, मात्र या तहसीलची निर्मिती करताना त्यामध्ये ज्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे ती गावे संगमनेर शहरालगत आहेत. संगमनेर खुर्द आणि बुद्रुक या दोन गावांना आजवर प्रवरामाईने घट्ट पकडून ठेवले होते. पायी अंतरावर असलेले संगमनेरचे तहसील कार्यालय सोडून संगमनेर खुर्दच्या नागरिकांना तब्बल 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वीला पाठवण्यामागचा प्रशासनाचा हेतू काय? अशी कितीतरी गावे आहेत ज्यांचा आश्वी बुद्रुक अप्पर तहसीलमध्ये समावेश हा संशयास्पद आहे. नवीन अप्पर तहसील कार्यालय त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे, यातून संगमनेरची भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रचना सुद्धा बिघडणार आहे. असे असताना कोणत्याही गावाला विश्वासात न घेता असा अप्पर तहसील निर्मितीचा प्रस्ताव बनतोच कसा? या पाठीमागे राजकीय डाव आहे.
संगमनेरचे स्वातंत्र्य मोडित काढण्याचा हा प्रयत्न आहे. एवढेच नाही तर शहराचे महत्त्व कमी करण्याची भूमिका देखील यामागे दिसते ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. सदर प्रकार संगमनेरला तोडण्याचा डाव असून त्यांच्या षडयंत्राची सुरुवात झाली आहे. यापुढे अशा अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावे लागेल. त्यासाठी मोठा संघर्ष करून संगमनेरसाठी आणलेले पाणी वाचविण्याची लढाई पुढील काळात लढावी लागेल, अनेक शासकीय कार्यालयांचे विभाजन करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, मात्र हे आम्ही सहन करणार नाही. प्रशासनाने राजकीय दबावातून भूमिका घेऊ नये, आपण सदैव जनतेसोबत असले पाहिजे. प्रशासनाने राजकारणाचा भाग होता कामा नये, अशी अपेक्षाही माजी मंत्री थोरात यांनी व्यक्त केली.
भरसभेत दाखवले ‘ते’ पत्र..
आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्तावच नाही असा प्रचार काहींकडून सुरू होता. त्याला उत्तर देताना भरसभेत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तहसीलदारांच्या सहीचे 24 तारखेचे पत्रच जनतेला दाखवले. त्यावर सरकार आणि प्रशासनाशी बोलणार असून, हा प्रस्ताव खोडसाळपणा आहे, तो वस्तुस्थितीला धरून नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांना पत्र देऊन जनभावना कळवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.