अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
वन विभागाच्या जिल्हा कार्यालयातील चंदनाच्या झाडांची चोरी करणार्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत आणखी दोन संशयित पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. 18 एप्रिल रोजी पहाटे 2.15 वाजण्याच्या सुमारास येथील वन विभागीय कार्यालयात ही धाडसी चोरी झाली होती. त्या वेळी रात्रपाळीवर असलेले वनमजूर रमेश पोपट शेळके (वय 58, रा. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर) यांना चार अज्ञात चोरट्यांनी अशोकाच्या झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर सहाय्यक वन संरक्षक यांच्या निवासस्थानाजवळील सुमारे 20 हजार रूपये किमतीची दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेली. या प्रकरणी शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक गठीत करण्यात आले. या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. संशयितांच्या हालचालींचे मार्ग, पूर्वीच्या चंदन चोरीच्या घटनांची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. तपासादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील मसीद नसीब गोलवाल (वय 24) आणि शाहीदखा अलीखा कलेसे (वय 26, दोघे रा. जंजाळा, ता. सिल्लोड) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील अजिंठा, सिल्लोड, बदनापूर, आडगाव माऊली, खामगाव आणि पळसे परिसरात सलग पाच दिवस शोधमोहीम राबवून या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी असलमखा भुरेखा पठाण आणि नसीबखा मुनीरखा जोनवाल (दोघे, रा. माहुली, आडगाव, सरक, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. सध्या हे दोघे पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.
खंडपीठाच्या परिसरातही चोरी
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठ परिसरातूनही चंदन चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांना पुढील तपासासाठी कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून तपास सुरू आहे.




