Tuesday, April 28, 2026
HomeनगरKopargaon : नदीजोड प्रकल्पातून गोदावरी खोर्‍यात 78 टीएमसी पाणी येणार

Kopargaon : नदीजोड प्रकल्पातून गोदावरी खोर्‍यात 78 टीएमसी पाणी येणार

दुष्काळमुक्तीसाठी महायुती सरकारचा ठोस निर्धार- ना. विखे पाटील

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसमृद्धी योजनांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामावर भर दिला आहे. तुटीच्या गोदावरी खोर्‍यात पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी नदीजोड प्रकल्पाद्वारे 78 टीएमसी पाणी आणण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, हे महायुती सरकारचे जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रेचे सोमवारी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आगमन झाले. 117 नद्यांच्या पाण्याचे संकलन असलेल्या जलकलशाचे पूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले, अत्यंत कुशल, दूरदर्शी आणि प्रजाहितदक्ष शासक अशी ओळख असणार्‍या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या काळात जलव्यवस्थापनाला विशेष प्राधान्य दिले होते. त्यांच्या जलसंधारण कार्याचा वारसा पुढे घेवून जाण्यासाठी व महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी गोदा ते नर्मदा जल यात्रेच्या माध्यमातून जलसंधारणाचे महत्त्व पटवून देणे आणि लोकसहभागातून शाश्वत जलव्यवस्थापनाची चळवळ उभी करण्यासाठी टाकलेले ठोस पाऊल असून गोदा ते नर्मदा जल यात्रा दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी हे उद्याचे भविष्य असून राज्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 300 वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे जलसंधारण आणि जल व्यवस्थापनाच्या बाबतीत पाण्याचा थेंब अन् थेंब जपून वापरण्याचा संदेश दिला, जो आजही अनुकरणीय आहे.

तोच वारसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा जल यात्रेच्या माध्यमातून पुढे घेवून जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी या जलयात्रेची संकल्पना विशद केली. ते म्हणाले, अहिल्यादेवींनी 300 वर्षांपूर्वी जलव्यवस्थापन, मंदिर पुनर्रचना आणि लोककल्याणकारी प्रशासनाचा जो आदर्श ठेवला, तोच मार्ग आज महायुती सरकार अनुसरत आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनीही पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेतून कोपरगाव परिसरात शेकडो बंधारे बांधून जलसमृद्धीचे कार्य केले. या जलयात्रेमुळे अहिल्यादेवींच्या कार्याची जाणीव संपूर्ण राज्याला होत आहे. याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

महाराष्ट्रात काही काळ पाण्याचा वापर केवळ राजकीय हत्यार म्हणून केला गेला. काही नेत्यांनी तालुके जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवले आणि तिथल्या लोकांचा वापर केवळ ऊसतोडीसाठी करून घेतला. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच एका योजनेसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. अहिल्यानगर नामकरणाचा सार्थ अभिमान संपूर्ण देशातील अहिल्याभक्तांना आहे, असे त्यांनी नमूद केले. या सोहळ्याला खासदार रामराव वडकुते, माजी मंत्री व शेतकरी नेते सदाभाऊ खोत, गोदावरी मराठवाडा जलसंपदा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमवार, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांच्यासह सर्व संचालक, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नगराध्यक्ष पराग संधान यांनी मानले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ग्रामपंचायतच्या 64 जागांसाठी आज पोटनिवडणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी व रिक्त झालेल्या सदस्यपदांच्या 85 जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. यातील सदस्यपदाच्या बिनविरोध आलेल्या...