नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी पासून भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार असून जवळपास एक महिना ही स्पर्धा चालणार आहे. मात्र ही स्पर्धा सुरु होण्या आधीच भारतात खेळण्यावरुन बांगलादेश संघाने मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेश सरकारनं भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे.
आयसीसी टी-२० स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पर्धेवर बहिष्कार टाकलाय अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येतेय. सुरक्षेच्या कारणास्तव वर्ल्ड कपचे सामने खेळण्यासाठी आपल्या संघाला भारतात पाठवण्यास बांगलादेशने नकार दिला असून आता त्यांच्या ऐवजी आयसीसी आगामी वर्ल्ड कपसाठी नव्या संघाची घोषणा लवकरच करू शकते.
BMC Mayor: मुंबईची सोडत जाहीर होताच महायुतीकडून महापौरपदासाठी ‘ही’ नावं चर्चेत
बांगलादेश सरकारच्या निर्णयानुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डाने यापूर्वी त्यांचे सामने सुरक्षेच्या कारणामुळे श्रीलंकेत खेळवावेत, अशी मागणी केली होती. मात्र, आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत चर्चा केली होती. बांगलादेशच्या बोर्डाला २१ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय कळवण्यासाठी मुदत दिली होती. बांगलादेश त्यांच्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे.
भारतात खेळण्याबाबत आयसीसीच्या भूमिकेबद्दल बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पुन्हा एकदा विचार करण्यासाठी आणखी एक दिवसाचा अवधी दिलेला होता. त्यानंतर मीडिया रिपोर्ट्सनुसार बांगलादेश सरकार आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल म्हणाले की, ‘आम्ही आयसीसीशी संपर्क साधत राहू. आम्हाला वर्ल्ड कप खेळायचा आहे, पण आम्ही भारतात खेळणार नाही. आम्ही लढत राहू. आयसीसी बोर्ड बैठकीत काल काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले. मुस्तफिजूरचा मुद्दा हा एकटाच वेगळा मुद्दा नाही. त्या प्रकरणात ते (भारत) एकमेव निर्णय घेणारे होते’.
मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळल्याने बांगलादेश क्रिकेट बोर्डाने प्रतिष्ठेचा विषय करत त्यांचे सामने श्रीलंकेत खेळवावेत, अशी भूमिका घेतली होती. याशिवाय बांगलादेशने आयसीसीला त्यांचा ग्रुप बदलण्याची मागणी केली होती. मात्र, बांगलादेशने केलेली मागणी आयसीसीने फेटाळून लावली होती.




