मुंबई । Mumbai
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्या संदर्भात काँग्रेस पक्षाशी अद्याप कोणताही संपर्क साधलेला नाही. या संदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात पसरवल्या जाणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका मांडताना भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात अशा प्रकारची कोणतीही चर्चा दोन्ही पक्षांमध्ये झालेली नाही. भाजपकडून अशा प्रकारच्या अफवा मुद्दाम पसरवल्या जात असून, यामागे राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करण्याचा मोठा डाव असल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे.
राजकीय रणनितीचा भाग म्हणून विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळली जात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पोटनिवडणुकीच्या काळात मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि मित्रपक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी अशा चुकीच्या बातम्यांचा आधार घेतला जात आहे. या अफवांमुळे महाविकास आघाडीच्या ऐक्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही संकेत काँग्रेसने दिले आहेत.
हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही निराधार बातम्यांवर विश्वास ठेवू नये. काँग्रेस पक्ष आपल्या निर्णयावर ठाम असून भाजपच्या कोणत्याही दबावाला किंवा अफवांना बळी पडणार नाही. बारामतीमधील ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असून, तिथे महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. भाजपने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याऐवजी लोकशाही मार्गाने निवडणूक लढवावी, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सध्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नेमक्या काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांच्या नजरा असतानाच काँग्रेसने भाजपच्या कथित ‘संपर्क’ मोहिमेचा पर्दाफाश केला आहे. या प्रकणामुळे भाजप आणि काँग्रेसमधील वाकयुद्ध आता अधिकच तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपकडून अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.




