Sunday, November 17, 2024
Homeनगरबरेली मांजाची धूम

बरेली मांजाची धूम

स्टॉलसाठी लगबग । पतंगांचे भाव उंचावर

अहमदनगर – पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेला पतंगोत्सवासाठी बच्चे कंपनी आतापासूनच तयारीला लागली आहेत. पंतगासोबतच मांजा विक्रीचे स्टॉल बागडपट्टीसह उपनगरातही लागण्यास सुरूवात झाली आहे. चायना मांजावर बंदी असल्याने यंदा बाजारात त्याला पर्याय म्हणून बरेली या जुन्याच मांजाला बच्चे कंपनीकडून मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पतंगाच्या किंमतीही वाढल्या आहेत.

- Advertisement -

नगरमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची मोठी परंपरा आहे. पतंग उडविण्याची लहानापासून मोठ्यापर्यत क्रेझ आहे. त्यामुळे संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे. नवीन वर्षातील सण उत्सवाची सुरूवात संक्रांतीपासून होते. 17 दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. पतंग व्यावसायिकांची पतंग बनविण्यासाठी लगबग सुरू आहे. बच्चे कंपनीने आतापासूनच पतंग उडविण्याचा सराव सुरू केला आहे. त्यासाठी पंतगासोबतच मांजाही खरेदी केली जात आहे.

पावसाळ्यातील चार महिने वगळता वर्षभर पतंग बनविण्याचा व्यावसाय नगरमध्ये चालतो. पतंगासाठी लागणारा पेपर गुजरात, मुंबई येथून येतो. तर मांजा रामपुर आणि कलकत्ता येथुन विक्रीला येतो. जिल्ह्यातील शिर्डी, नगर, राहूरी, घोडनदी, पाथर्डी, शेवगाव, कोल्हार आदी ठिकाणी संक्रातीच्या सणाला पतंग उडविण्याची क्रेझ बच्चे कंपनीत असते.

मांजाही महागला !
चायना पतंगापेक्षा सांबा आणि फर्‍या पतंगाला मुलांची अधिक पसंती मिळत आहे. चायना पतंग हा पंजाब, कानपूर, गुजरात आणि दिल्ली येथून विक्रीला येतात. कच्चा मालाचा तुटवडा असल्याने उत्पादन घटले आहे. मंदीचा परिणाम मार्केटवर झाल्याचे व्यावसायिक सांगतात. पतंगाचे दर वाढले असून बरेली मांजाचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत.

यंत्रणा सुस्त
घातक मांजामुळे अनेक पक्षी, पशू व माणसांना प्राण गमवावे लागले आहेत. नायलॉन, चायनीज मांजाच्या व्यापार, साठवणूक, विक्री व वापरावर सरसकट बंदी आहे. मात्र अजूनही या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. शहरात महापालिका, पोलिसांसह अन्य स्थानिक यंत्रणांनी मांजा विक्री रोखण्यासाठी उपाययोजना आखल्याचे दिसत नाही.

चारशेचा पतंग अन् चायना चोरी छुपके
बरेली मांजामध्ये वर्धमान मांजा, शहातूर शहा मांजा, मैदानी धुला आदी प्रकार आहेत. या मांज्याचे दर 120 ते 200 रुपयांपर्यत आहेत. 900 मीटर मांजासाठीचे हे दर आहेत. विविध आकाराचे रंगीबेरंगी पतंग 2 रुपयांपासून ते 400 रुपयांपर्यंत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत पतंग उडवण्यासाठी सुती दोर्‍यांपासून तयार केलेला मांजा वापरात होता. मात्र, हा मांजा कमकुवत ठरू लागल्याने काटाकाटीच्या खेळात चीनी, नायलॉनच्या मांजाचा वापर वाढला. मात्र, चायना मांजावर बंदी असूनही त्याची काळ्यात बाजारात चांगलीच विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीपासून पतंग उडविण्याला नगर शहरात सुरूवात होते. पण यंदा उशिरापर्यत पाऊस सुरू राहिल्याने पाहिजे तशी पतंग विक्री झाली नाही. संक्रातीला विक्रीचा धंदा तेजीत असतो. मंदीचा परिणाम पतंगाच्या मार्केटवरही झाला आहे.
– कन्हैया चिपोळे, पतंग व्यावसायिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या