श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 2 मधील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला. त्याठिकाणाहून तब्बल तीन लाख रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस जप्त केले, याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पोसई अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, संदीप दरंदले, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आतार व उमाकांत गावडे यांचे पथक नेमले.
हे पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारांमार्फत वॉर्ड नंबर 2 येथील पाण्याच्या टाकीजवळ सलमान हसन कुरेशी याच्या घरासमोर काही इसम गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता याठिकाणी काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करताना मिळून आले. पथकाला पाहताच संशयित इसम त्याठिकाणाहून पळून जाऊ लागले. त्यावेळी पोलीस पथकाने एका इसमास ताब्यात घेत त्याचे नाव विचारले असता त्याने जुबेर कुरेशी असे सांगितले,
तसेच पळून गेलेल्या इसमांची नावे विचारली असता सलमान कुरेशी, अबुबकार कुरेशी, साकिबा अब्दुलरेहमान कुरेशी, आयान कुरेशी (सर्व रा. वॉर्ड नं. 2) असे असल्याचे सांगितले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावरून तीन लाख रुपये किमतीचे 1500 किलो गोमांस, सुरा, लोखंडी कुर्हाड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस चे कलम 123, 271, 325, 3 (5), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ) (ब) (क)9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.