Friday, May 3, 2024
Homeनगरकरोनासदृश लक्षणे असलेल्या भानसहिवरेच्या महिलेचा मृत्यू

करोनासदृश लक्षणे असलेल्या भानसहिवरेच्या महिलेचा मृत्यू

नेवासा|तालुका वार्ताहर|Newasa

कोव्हिड-19 आजाराच्या सदृश लक्षणे असलेल्या सोनईतील एकाचा मृत्यू झाल्यानंतर अशीच लक्षणे असलेल्या तालुक्यातील भानसहिवरा येथील एका वयोवृद्ध महिलेचाही (वय 70) मृत्यू झाला असून या महिलेच्या संपर्कातील तिघांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील सोनई येथील एका 54 वर्षीय व्यक्तीस करोना सदृश लक्षणांमुळे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र करोना चाचणी अहवालाआधीच त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या संपर्कातील 20 जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले. भानसहिवरा येथील महिलेच्या संपर्कातील तीन जणांना कोव्हिड सेंटरमध्ये हलविण्यात आले असून त्यांचेही स्वॅब घेण्यात आले.

बुधवारी भानसहिवरा येथील 70 वर्षे वयाच्या महिलेला सकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असता तिचा वाटेत मृत्यू झाला. सदरच्या स्थानिक डॉक्टरांनी ही माहिती शासकीय यंत्रणेस कळविल्याने त्वरित तहसीलदार रुपेश सुराणा व तालुका वैद्यकीय अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी भानसहिवरा येथे भेट देऊन सदर महिलेच्या नातेवाईकांसमोर अंत्यविधी केला.

सदर महिलेला तीव्र स्वरूपाचा अ‍ॅमेनिया असल्याने व त्यांच्या शरिराततील रक्ताचे प्रमाण केवळ 5 वर आल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. सकाळी सात वाजता या महिलेला दवाखान्यात आणले जात असताना तिचा मृत्यू झाला होता. तसेच सदरची महिला काही दिवसांपूर्वी पुणे येथून आली असल्याचे समजल्याने प्रशासनाने काळजी म्हणून तिच्या संपर्कातील तीन जणांना नेवासा येथील कोव्हिड सेवा केंद्रात आणले व त्यांचे स्त्राव घेऊन नगरला तपासणीसाठी पाठविण्यात आले.

सगळीकडे करोनाचा प्रभाव वाढू लागल्यामुळे सर्वच अस्वस्थ होत असताना नेवासा तालुक्यात सलग दोन दिवस मृत्यू पावलेले संशयित रुग्ण आढळल्याने क्वारंटाईन होणार्‍यांच्या संख्येत वाढ होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या