भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara
भंडारदरा धरण परिसर आणि पाणलोटात काल रविवारी सायंकाळी 6 वाजेपासून जोरदार पाऊस सुरू होता. पाच साडेपाच वाजल्यापासून हळुवार पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर काही वेळातच अधूनमधून जोरदार सरी कोसळण्यास सुरूवात झाली.
जोरदार पाऊस कोसळत असल्याने डोंगर दर्यांवरील धबधबे पुन्हा जोरदार सुरू झाले आहेत. ओढे-नालेही भरभरून वाहु लागले आहेत. धरणात नव्याने पाण्याची आवक वाढू लागल्याने नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडेतही आवक वाढू लागल्याने या धरणातून खाली प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
पावसाचा अलर्ट वाढला
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात आधी 23 तारखेपर्यंत विजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, यात एक दिवसाची वाढ करण्यात आली असून आता जिल्ह्यात 24 तारखेपर्यंत जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट राहणार आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशीरापर्यंत आणि रविवारी सायंकाळी जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस झाला आहे.
या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साठले असून हा पाऊस रब्बी हंगामातील पेरण्यासाठी उपयुक्त राहणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात पडणार्या पावसात तालुकानिहाय तफावत दिसून येत असून विशेष करून नगर जिल्ह्यातील उत्तर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे, तर दक्षिण विभागात जादा आहे. गेल्या आवठड्यात हवामान विभागाने जिल्ह्यातील परतीचा पावसाचा मुक्काम लांबणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आजपासून सुरू होणार्या नवरात्री उत्सवात पावसामुळे चैतन्याचे वातावरण राहणार असून विजयादशमी (दि.2 ऑक्टोबरपर्यंत) पाऊस सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी रात्री नगर शहरासह राहुरी तालुक्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात 24 तारखेपर्यंत म्हणजेच बुधवारपर्यंत पावसाचा यलो अर्लट राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.




