Thursday, May 2, 2024
Homeनगरभेंडा-कुकाणा परिसरातील 13 खासगी पशुवैद्यकांना जनावरांच्या ‘ब्रुसेलॉसीस’ची बाधा

भेंडा-कुकाणा परिसरातील 13 खासगी पशुवैद्यकांना जनावरांच्या ‘ब्रुसेलॉसीस’ची बाधा

सर्वांवर पुण्यात उपचार सुरू; संसर्गामुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकांसह पशुपालकही धास्तावले

नेवासा- जनावरांच्या सतत संपर्कात असणारे शेतकरी, गोठ्यात काम करणारे महिला-कामगार आणि जनावरांवर उपचार करणारे पशुवैद्यक हे बाधित जनावरांमधील ब्रुसेलॉसिस आजाराच्या जिवाणूला बळी पडत असून नेवासा तालुक्यातील भेंडा-कुकाणा परिसरातील खासगी सेवा देणार्‍या 16 पैकी 13 पशुवैद्यांना ब्रुसेलॉसीस आजाराची बाधा झाल्याचे पुणे येथील तपासणीत निष्पन्न झाले असून हे सर्व पशुवैद्यकीय डॉक्टर पुणे येथे उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या रोगाच्या संसर्गाच्या भीतीने पशुवैद्य व पशु वैद्यकीय कर्मचार्‍यांसह पशुपालकही धास्तावले आहेत.

- Advertisement -

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत नगर जिल्ह्यात 97 पशुधन विकास अधिकारी, 39 सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, 141 पशुधन पर्यवेक्षक, 37 व्रणोपाचारक/ड्रेसर व 255 परिचर असे एकूण 569 पशुवैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय जिल्ह्यात हजारो पशुधन पालक, खाजगी पशुवैद्य यांचाही सातत्याने जनावरांशी संपर्क येतो. या सर्वांनाच ब्रुसेलॉसिसचा कमी अधिक प्रमाणात संसर्ग होण्याची भीती आहे.

काय आहे ब्रुसेलॉसिस?
ब्रुसेलॉसिस आजार हा जनावरांच्या सांसर्गिक गर्भपातातून ब्रुसेला अबॉर्टस जिवाणूमुळे होतो.प्रत्यक्ष जनावरांच्या सानिध्यात काम करणारे,उपचार करणारे पशुवैद्य व वैद्यकीय कर्मचारी,गोठ्यात काम करणारे शेतकरी-कर्मचारी,महिला या व्यक्तींना आजाराचे संक्रमण होण्याचा जास्त धोका असतो. वासरू पूर्ण वाढ झाल्यानंतर, गाभणपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये जर सारखा सारखा गर्भपात होत असेल तर ते जनावर ब्रुसेलॉसिसने बाधित असू शकते.

संक्रमण- आजाराचा प्रसार हा संक्रमित प्राण्याच्या सानिध्यात आल्यास काही वेळा श्वसनाव्दारे हवेमध्ये असणारे जिवाणू शरिरामध्ये गेल्याने, त्वचेला संक्रमण झाल्याने, संक्रमित प्राण्यांचा संपर्क त्वचेला झालेल्या जखमेला झाल्यास या आजाराचा प्रसार होतो. तसेच गर्भपात झालेल्या जारातील पाणी किंवा रक्तमिश्रित पाणी यामुळे रोगाचा फैलाव होण्याची शक्यता जास्त असते.

ब्रुसेलॉसिसची लक्षणे – पाठदुखी, भूक मंदावणे, थंडी येणे, सुस्ती येणे, प्रचंड डोकेदुखी, पोटात आणि पोटाचे आजुबाजूने दुखणे, सांध्यात प्रचंड वेदना होणे, तीव्र आणि चढ-उताराचा ताप येणे, अचानक वजन घटणे, अशक्तपणा, घाम येतो, नैराश्य येते. स्नायू व शारीरिक वेदना, एन्सेफलाइटिस,एंडोकार्डिटिस मेनिनजाइटिसचाही धोका निर्माण होऊ शकतो.

उपाययोजना- गायी-म्हैस यांची गर्भपात झालेली जागा व संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. गर्भपात झालेली जागा जाळावी. जनावरे आणि गोठ्याची नियमित स्वच्छता करावी. गोठ्यात जनावरे बदलतांना किंवा नवीन मागवताना विशेष काळजी घ्यावी. संक्रमण झालेले प्लासेंटा (नाळ) व गर्भाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.शेतकरी-गोठ्यात काम करणारे कर्मचारी व प्राण्यांवर उपचार करणारे पशुवैद्यकीय कर्मचारी (डॉक्टर) तसेच सतत प्राण्यांच्या संपर्कात असणार्‍या लोकांनी विशेष काळजी.

ब्रुसेलॉसिस हा एक असा संसर्गजन्य आजार आहे की जो बॅक्टेरियाच्या समूहामुळे होतो.
घ्यावयाची काळजी – ब्रुसेलॉसिस या बैक्टीरिया विशेषतः जनावरे आणि माणसं दोघांनाही संक्रमित करते. ब्रुसेलॉसिसला प्रतीबंध करण्यासाठी पशु-जनावरे यांचे सोबत काम करताना हँडग्लोज, मास्क, चष्मा व सुरक्षात्मक कपड्यांचा वापर करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय पातळीवर 27.5 टक्के लोक प्रभावित…

नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्नाल, हरियाणा यांनी अलिकडेच केलेल्या एका सर्व्हेनुसार राष्ट्रीय पातळीवर पशुपालन आणि डेअरी व्यवसाय करणारे माणसं, पशुवैद्यकीय कर्मचारी यातील सुमारे 27.5 टक्के पशुवैद्य आणि 5.1 टक्के पशुधन पालक या ब्रुसेलोसिसने प्रभावीत आहेत.

शासनाने तरतूद करावी-डॉ.तुंबारे
जनावरांना ब्रुसेलॉसिस होऊ नये यासाठी लस उपलब्ध आहे परंतु माणसांसाठी लस नाही. फक्त काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी नाशिक येथे कॅम्प घेऊन पशुवैद्यकीय कर्मचार्‍यांची ब्रुसेलॉसिस चाचणी (टेस्ट) केली होती. यासाठी शासनाकडून कुठल्याच निधीची तरतूद नाही. त्यामुळे हा सर्व खर्च कर्मचार्‍यांच्या वर्गणी तून करण्यात आला होता.किमान वर्षांतून एकदा सर्व पशु वैद्यकीय कर्मचार्‍यांची ब्रुसेलॉसिस चाचणी करण्यासाठी निधीची तरतूद करावी.निधीची तरतूद करण्यासाठी लवकरच प्रयत्न करण्यात येणार आहेत.

दरम्यान नेवासा तालुक्यातील भेंडा-कुकाणा परिसरात खाजगी सेवा देणार्‍या 16 पशुवैद्यांनी स्वतःची ब्रुसेलॉसिसची पुणे येथे तपासणी (टेस्ट) केली असता 16 पैकी 13 जणांना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून ते पुणे येथे खाजगी डॉक्टरकडून उपचार घेत आहेत.

30 ते 40 टक्के पशुवैद्य-पशुपालक बाधित…
सातत्याने जनावरांच्या संपर्कात येणारे 30 ते 40 टक्के पशु वैद्यकीय डॉक्टर आणि शेतकरी, महिला या ब्रुसेलोसिस आजाराने बाधीत असतातच.परंतु जोपर्यंत शरिरात प्रतिकारशक्ती आहे तोपर्यंत या रोगाचा संसर्ग झाल्याचे लक्षात येत नाही. लक्षणे दिसू लागल्यावरच ते समजते. ताप येतच असतो असे समजून सहज घेतलं जातं. परंतु सांध्यात प्रचंड वेदना होणे, तीव्र आणि चढ उताराचा ताप येणे, अचानक वजन घटणे, अशक्तपणा, घाम येतो, डोकेदुखी यासारखी लक्षणे दिसू लागल्यावर समजते की ब्रुसेलॉसिसचा प्रकार आहे. दवाखान्यात सर्व तपासण्या करण्यासाठी एक दीड महिन्याचा कालावधीही लागतो. निदान झाल्यावर पूर्ण बरे व्हायला मला 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागला.
– डॉ. मनोज शिंदे, पशुधन विकास अधिकारी, जोहारापूर

लसीकरण करून घ्यावे..
पशुधन पालकांनी 4 ते 12 महिने वयाच्या सर्व वासरांना (विशेषतः मादी वासरे) लसीकरण करून घ्यावे.अशा वासरांना एकदा लसीकरण केल्यास त्याचा त्याला आयुष्यभर लाभ होतो. गायींपेक्षा म्हैस वर्ग पशुधन पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
-डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अहमदनगर

जिल्हा परिषद सभेत आवाज उठविणार
नगर जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे.त्यामुळे जनावरे आणि जनावरांच्या संपर्कात येणारे पशुधन पालक, पशुवैद्यकीय कर्मचारी यांच्या आरोग्याचा हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. ब्रुसेलॉसिस या आजाराची तपासणी करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषद जनरल बॉडी मिटिंगमध्ये मी आवाज उठविणार आहे.
– दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद सदस्य

- Advertisment -

ताज्या बातम्या