Sunday, May 19, 2024
Homeनगरभिंगारचा गुन्हेगार नाशिक कारागृहात ‘स्थानबध्द’

भिंगारचा गुन्हेगार नाशिक कारागृहात ‘स्थानबध्द’

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्था बाधीत करणार्‍या सराईत गुन्हेगाराला जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबध्द करण्याचे आदेश दिले आहे. निलेश सुनील पेंडुलकर (वय 27 रा. पाटील गल्ली, भिंगार) असे त्यांचे नाव आहे.

- Advertisement -

पेंडुलकर याने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करणे, लोकसेवकास मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय आदेशाचा भंग करणे असे सराईतपणे गुन्हे करून भिंगार व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक सुव्यस्था बाधीत केली होती. त्याच्या विरोधात एकुण सहा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात येवून देखील त्याच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती.

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी त्याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबध्देतेची कारवाई करावी, असा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे सादर केला होता. अधीक्षक ओला यांनी प्रस्तावाची पडताळणी करून अहवाल जिल्हाधिकारी सालीमठ यांना सादर केला होता. त्यांनी पेंडुलकर याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई करण्याबाबत आदेश काढले आहेत.

आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, रवींद्र पांडे, राम माळी, दत्तात्रय गव्हाणे, रवींद्र कर्डीले, फुरकान शेख, शिवाजी ढाकणे, कैलास सोनार यांच्या पथकाने पेंडुलकर याला तात्काळ ताब्यात घेवून नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या